नवी दिल्ली – क्रिसिल या संघटनेने भारतातल्या विविध राज्यांच्या प्रगतीचा, समृद्धीचा, दरडोई उत्पन्नाचा आणि समृद्धीच्या समान वाटपाचा सविस्तर अभ्यास केला असून पंजाब आणि केरळ ही दोन राज्ये देशातली सर्वात समृद्ध आणि सर्वात अधिक समतावादी राज्ये असल्याचे दिसून आले आहे. समृद्धी आणि वाटप यांच्या बाबतीत या दोन राज्याच्या खालोखाल गुजरातचा नंबर आहे. महाराष्ट्र हे राज्य दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत आघाडीवर आहे. ज्या राज्यातले लोक अधिकतर प्रमाणात परदेशी जाऊन पैसा कमावतात आणि तो आपल्या राज्यात पाठवतात ती राज्ये समृद्धीत आणि ग्राहकोपयोगी वस्तूंच्या वापराच्या बाबतीत आघाडीवर असल्याचे दिसले आहे.
पंजाबातले बरेच लोक परदेशी जाऊन धंदा-व्यवसाय करतात. अमेरिका, कॅनडा या देशांमध्ये पंजाबी लोक मोठ्या संख्येने गेलेले आहेत. केरळमधील लोक मोठ्या प्रमाणावर आखाती देशात जाऊन नोकर्या करतात असे दिसले आहे. तिथे त्यांना चांगले वेतन मिळते, त्यातला काही हिस्सा ते केरळमधल्या आपल्या घरी पाठवतात. त्यामुळे केरळच्या समृद्धीला हातभार लागला आहे. गुजरातमधील लोक नोकर्यांसाठी तर परदेशी जातातच पण ते अनेक ठिकाणी व्यवसाय सुद्धा करतात. दक्षिण आङ्ग्रिका, कॅनडा, अमेरिका त्याचबरोबर लॅटिन अमेरिकेतल्या देशांमध्ये गुजराती लोक मोठ्या संख्येने आहेत. त्यामुळे पंजाब, केरळ आणि गुजरात ही राज्ये वेगवान विकास, समृद्धी आणि समान वाटप याबाबतीत आघाडीवर आहेत.
या संबंधात हरियाना, कर्नाटक, महाराष्ट्र, तामिळनाडू या राज्यांचे क्रमांक लागतात. ही राज्ये विकसित आहेत. निव्वळ समृद्धीचाच विचार केला तर या यादीमध्ये गुजरातचा क्रमांक सहावा आहे. परंतु घरामध्ये उपलब्ध असलेल्या साधनांचा विचार केला तर गुजरात तिसर्या क्रमांकावर आहे. या साधनांमध्ये कार, दुचाकी वाहन, संगणक, वातानुकूलन यंत्र, मिक्सर, ङ्ग्रीज, वॉशिंग मशीन यांचा समावेश होतो.
एकंदरीत पंजाब, केरळ, गुजरात, महाराष्ट्र, तामिळनाडू, कर्नाटक, हरियाना ही राज्ये आघाडीची राज्ये आहेत तर मध्य प्रदेश, ओरिसा, झारखंड, बिहार, उत्तर प्रदेश ही राज्ये गरीब राज्ये ठरली आहेत. देशातले सर्वात अविकसित राज्य म्हणून मध्य प्रदेश आणि ओरिसाचा उल्लेख झालेला आहे.