मारहाण प्रकरणी गोविंदाला उच्च न्यायालयाचा दिलासा

मुंबई – चित्रपटाचे शुटिंग पाहण्यास आलेल्या प्रेक्षकाच्या श्रीमुखात भडकावून वादाच्या भोवर्‍या अडकलेल्या सिन अभिनेता गोविंदाला उच्च न्यायालयाने आज मोठा दिलासा दिला. दंडाधिकारी न्यायालयाने खाजगी तक्रारीची दखल घेवून सुरू केलेल्या कार्यवाहीत काहीच तथ्य नाही. त्याच्या विरोधात गुन्हा सिद्ध करणारा कोणताही ठोस पुरावा नसल्याचे स्पष्ट करत न्यायमूर्ती एम. एल. टहिलयानी यांनी गोविंदा विरोधातील दंडाधिकारी न्यायालयातील तक्रार रद्द केली.

पाच वर्षापूर्वी गोरेगाव येथील ङ्गिल्मीस्तान स्टुडिओमध्ये मनी है तो हनी है या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या वेळी गोविंदाने आपल्या श्रीमुखात मारल्याची खासगी तक्रार संतोष राय या तरूणाने एक वर्षानंतर दंडाधिकारी न्यायालयात दाखल केली होती. या तक्रारीची दखल घेऊन दंडाधिकारी न्यायालयाने गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात गोविंदा विरोधात समन्स बजावून कार्यवाही सुरू केली होती. त्यामुळे अडचणीत सापडलेल्या गोविंदाने उच्च न्यायालयात धाव घेऊन ही तक्रार रद्द करावी, अशी विनंती करणारी याचिका दाखल केली होती.

त्या याचिकेवर न्यायमूर्ती एम. एल. टहिलया यांच्यासमोर आज सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने घटना घडल्यानंतर एका वर्षानंतर दाखल करण्यात आल्याने दंडाधिकारी न्यायालयाला कलम 323 आणि 504 अन्वये गुन्ह्याची दखल घेता येणार नाही. तसेच कलम 506 अन्वये दंडाधिकार्‍यांनी संबंधित गुन्हा सिद्ध करण्यास प्रथमदर्शनी पुरावे आहेत का? याचा विचार केला पाहिजे, असे स्पष्ट मत व्यक्त करून दंडाधिकारी न्यायालयातील तक्रार रद्द केली.