भारताच्या मंगळ मोहिमेत पहिला अडथळा

नवी दिल्ली – भारतासाठी अभिमानाच्या आणि ऐतिहासिक असलेल्या मंगळ मोहिमेत आता मंगळ’आलाय. इस्त्रोच्या मिशन मार्ससमोर पहिला अडथळा उभा राहिलाय. या मंगळ यानाला पृथ्वीपासून एक लाख मीटरचं अंतर गाठण्याच अपयश आलंय.

आज या यानाची कक्षा वाढवली जाणार होती. पण या अपयशानंतर आता हे यान अपेक्षित अंतरावर नेण्यासाठी इस्त्रो उद्या पुन्हा प्रयत्न करणार आहे. सध्या हे यान पृथ्वीभोवती फिरत आहे. मागील आठवड्यात 5 नोव्हेंबर रोजी भारताच्या पहिल्या मंगळ यानानं यशस्वी उड्डाण केलंय. श्रीहरीकोटामधून दुपारी 2 वाजून 38 मिनिटांनी हे यान अवकाशात झेपावलं. आणि जवळपास 40 मिनिटात ते पृथ्वीच्या कक्षेत स्थिरावलं. त्यामुळे मंगळ मोहिमेतला हा पहिला टप्पा भारतानं यशस्वीपणे पार केला आहे.

आता यापुढे 9 महिन्यांनंतर म्हणजे सप्टेंबर 2014 मध्ये हे यान मंगळाच्या कक्षेत स्थिरावणार आहे. मंगळयानाचं प्रक्षेपण झालं असलं तरी यानाचा मंगळाकडचा प्रवास सुरू होईल ते 1 डिसेंबरनंतर. कारण 1 डिसेंबरनंतर हे यान पृथ्वीच्या कक्षेतून बाहेर पडेल. यापूर्वी अमेरिका, रशिया आणि युरोपियन युनियन यांच्या मंगळ मोहिमा यशस्वी झाल्या आहे. तर चीन आणि जपान यांच्या मोहिमा अपयशी ठरल्यायत. त्यामुळे मार्स ऑर्बिटर यानाला मंगळाच्या कक्षेत सुखरूप दाखल करणं, हे भारतीय शास्त्रज्ञांपुढचं आव्हान असणार आहे.

Leave a Comment