भारतरत्न हा कॉंग्रेसचा किताब नाही

मुंबई प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष जनार्दन चांदूरकर यांनी लता मंगेशकर यांचा भारतरत्न किताब परत मागितला आहे. खरे म्हणजे त्यांना हा किताब परत मागण्याचा अधिकार नाही कारण तो किताब कॉंग्रेसने दिलेला नाही. केंद्र सरकारने आणि भारतीय जनतेने दिलेला आहे. तो किताब देताना लता मंगेशकर यांना आपली राजकीय भूमिका कॉंग्रेसच्या दावणीला बांधावी अशी काही अट घातलेली नव्हती. तेव्हा चांदूरकरांनी असा उपद्व्याप करून स्वतःचे हसे न करून घेतलेले बरे. मात्र सध्या कॉंग्रेसचे नेते एवढे बावचळले आहेत की त्यांना आपण काय बोलतो हेच कळेनासे झाले आहे. आपण जे बोलू ते अंगलट येत आहे तेव्हा विचार करून बोलावे किंबहुना गरज नसेल तर बोलूच नये एवढेही तारतम्य त्यांना राहिलेले नाही. त्यामुळे त्यांनी सगळ्याच पद्म पुरस्कार प्राप्त व्यक्तींना धमक्या द्यायला सुरूवात केली आहे. आणीबाणीच्या काळात कॉंग्रेसच्या नेत्यांनी असेच उद्योग केले आहेत. या काळात संजय गांधी यांचा असाच धुडगूस चालू होता. सारे राजकारण, केंद्र सरकारची साधनसामुग्री ही सारी कॉंग्रेसची मालमत्ता आहे असे समजून वागण्याची ही प्रवृत्ती असे दर्शविते की कॉंग्रेसने लादलेली आणीबाणी १९७७ साली उठली असली तरी कॉंग्रेसच्या नेत्यांची आणीबाणीकालीन मनःस्थिती अजूनही सुधारली नाही.

या लोकांनी नरेंद्र मोदी यांना लता मंगेशकर यांनी दिलेल्या पाठिंब्याचा इतका धसका घेतला आहे की नरेंद्र मोदी यांना पाठिंबा देणार्‍यांचे पद्म पुरस्कार आणि भारतरत्न सारखे किताब परत घेतले पाहिजेत अशी मागणी केली आहे. एवढेच नव्हे तर त्यासाठी रस्त्यावर उतरण्याची तयारी सुरू केली आहे. त्यांच्या मागणीतला पोरकटपणा अजून कोणाच्या लक्षात आला नाही. पद्म पुरस्कार किंवा भारतरत्न किताब देताना तो किताब घेणार्‍यांनी आपली राजकीय भूमिका लपवून ठेवली पाहिजे अशी काही अट घातलेली नसते. एखादा माणूस भारतीय जनता पार्टीचा आहे म्हणून तो पद्म पुरस्काराला अपात्र असतो असाही काही कायदा नाही. म्हणूनच भारतीय जनता पार्टीचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना कॉंग्रेसच्याच सरकारने पद्मविभूषण पुरस्कार दिलेला आहे. चांदूरकरांनी एकदा पद्म पुरस्कारांची यादी मागवून घ्यावी म्हणजे त्यांच्या डोक्यात प्रकाश पडेल. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधान पदाला पाठिंबा देणार्‍यांना भारतरत्न किताब जवळ ठेवण्याचा अधिकार नाही असे कॉंग्रेसचे नेते म्हणत आहेत.

चांदूरकरांनी केलेली ही मागणी पाहून असे म्हणावेसे वाटते की कोणाचे पद्म पुरस्कार परत घ्यावेत की नाही पण त्याआधी चांदूरकरांच्या वकिलीची सनद मात्र परत घेतली पाहिजे. कारण त्यांना एक सामान्य नियम आणि कायदासुध्दा माहीत नाही की नरेंद्र मोदी हे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत आणि भारतीय जनता पार्टी ही भारतीय घटनेने मान्यता दिलेली, निवडणूक आयोगाने राष्ट्रीय पक्ष म्हणून आपल्या यादीवर घेतलेली, कायदेशीरपणे चालणारी संघटना आहे. तिच्या पंतप्रधानपदाच्या उमेदवाराला पाठिंबा देणे हा कायद्याने गुन्हा होत नाही. तो देशातल्या कोणत्याही सामान्य मतदाराचा मुलभूत हक्क आहे. नरेंद्र मोदी यांची उमेदवारी बेकायदा असती तर ते तीन वेळा गुजरातचे मुुख्यमंत्री होऊच शकले नसते. मोदींची पंतप्रधानपदाची उमेदवारी बेकायदा असेल तर चांदूरकरांनी तिच्या कायदेशीरपणाला न्यायालयात हरकत घ्यावी. पण ते तशी हरकत घेत नाहीत. मात्र बेकायदेशीर, अनैतिक आणि अतार्किक अशा पध्दतीने लोकांवर दबाव आणून नरेंद्र मोदींच्या समर्थनार्थ कोणीही पुढे येऊ नये. अशी कोशीश करत आहेत.

पद्म पुरस्कार आणि भारतरत्न किताब हे राजकारणापासून दूर आहेत असाही काही कायदा नाही. म्हणूनच आजपर्यंत हे किताब इंदिरा गांधी, राजीव गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लालबहादूर शास्त्री, सरदार पटेल, एम.जी. रामचंद्रन अशा जन्मभर राजकारण करणार्‍या लोकांना दिले गेले आहेत. भारताच्या लोकशाहीचा गळा घोटून देशावर १९ महिने आणीबाणीच्या रूपाने हुकूमशाही लादणार्‍या इंदिरा गांधींना सुध्दा हा किताब दिलेला आहे. त्यांनी हा किताब मिळाल्यानंतर चार वर्षांनी भारतावर आणीबाणी लादली. देशातल्या लाखो राजकीय कार्यकर्त्यांना न्यायालयासमोर एक मिनिटभरही उभे न करता १८ महिने कारागृहात टाकले. परंतु देशाची लोकशाही संपुष्टात आणणार्‍या इंदिरा गांधींचा भारतरत्न किताब परत घ्यावा अशी मागणी कोणी केली नाही. राजीव गांधींनाही हा पुरस्कार दिला गेला. त्यांनी आपल्या आईच्या मृत्यूनंतर शीखांचा सूड उगवण्यासाठी एका दिवसात दिल्ली शहरात तीन हजार शीखांच्या जाळून हत्या केल्या. सोनिया गांधी यांनी या हत्याकांडाबद्दल शीख समाजाची माङ्गी मागितली. परंतु झालेल्या अपराधाबद्दल केवळ माङ्गी न मागता आपल्या पतीचा भारतरत्न किताब परत करावा अशी सद्बुध्दी त्यांना सुचली नाही. आता चांदूरकर लता मंगेशकर यांच्या भारतरत्न किताबासाठी रस्त्यावर उतरणार आहेत पण त्यांनी पूर्वीच राजीव गांधी यांचा भारतरत्न पुरस्कार परत मागण्यासाठी रस्त्यावर यायला हवे होते.

Leave a Comment