पेप्सीकोची भारतात ३३ हजार कोटींची गुंतवणूक

नवी दिल्ली – थंड पेये तयार करणार्‍या जगप्रसिद्ध पेप्सीको कंपनीने भारतात आगामी सात वर्षात ३३ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचा निश्‍चय केला आहे. भारतात गुंतवणुकीला असलेली उत्तम संधी विचारात घेऊन कृषी, पायाभूत सोयी आणि उत्पादन या तिन्ही क्षेत्रात ही गुंतवणूक करण्याचा निर्णय कंपनीने घेतला असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रा नुई यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितली.

पेप्सीकोने अशी गुंतवणूक करण्याचा निर्णय घेणे म्हणजेच भारताच्या गुंतवणुकीस अनुकूल धोरणांवर विश्‍वास व्यक्त करणे आहे, असे इंद्रा नुई म्हणाल्या. पेप्सीकोला भारतात नेहमीच चांगले मार्केट मिळालेले आहे. सध्या या कंपनीच्या भारतातल्या पेयांच्या विक्रीतून वर्षाला एक हजार कोटी रुपयांची उलाढाल होते. पेप्सीकोची आठ पेये भारतात विकली जातात आणि त्यांची निर्मिती करण्यासाठी भारतात ४२ कारखाने उभारलेले आहेत.

सध्या पेप्सीकोने भारतामध्ये दोन लाख लोकांना रोजगार दिलेला आहे आणि येत्या सात वर्षात होणार्‍या ३३ हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून १ लाख लोकांना रोजगार मिळणार आहे. भारतामध्ये नवी गुंतवणूक करताना कंपनीने पाणी, पर्यावरण आणि विजेची बचत होईल अशी दक्षता घेतलेली आहे. कोणत्याही नव्या प्रकल्पात गुंतवणूक करताना नवे आणि कार्यक्षम तंत्रज्ञान वापरले जाईल याबाबत कटाक्ष ठेवला आहे, असेही इंद्रा नुई म्हणाल्या.

Leave a Comment