जागा वाटपावरून काँग्रेस-राष्ट्रवादीत रस्सीखेच

मुंबई – आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय नेत्यांनी आत्तापासून शह-काटशहचं राजकारण खेळायला सुरुवात केली आहे. कोणाच्या पदरात कोणता मतदारसंघ टाकता येईल आणि कोणत्या पक्षाकडून मतदारसंघ काढून घेता येईल यावरून सध्या राजकीय कुरघोडी सुरू आहेत.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय नेत्यांमध्ये जागांवरून डावपेच सुरू झालेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जागावाटपावरून रस्सीखेच सुरू झाली आहे. सांगलीच्या शिराळा-वाळवा कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात मुख्यमंत्र्यांनी केलेल्या विधानावरून हे स्पष्ट होत आहे.

शिराळा तालुक्यातून सत्यजित देशमुख यांना संधी देण्याची मागणी करण्यात आली आहे. त्यांनी या मतदारसंघात काँग्रेससाठी खूप मेहनत घेतली. सत्यजित देशमुख हे काँग्रेस नेते शिवाजीराव देशमुख यांचे सुपुत्र असल्याने त्यांना संधी मिळण्याची अधिक शक्यता आहे. मात्र याच शिराळा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील निवडणूक लढवण्यास उत्सुक आहेत.

मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा पश्चिम महाराष्ट्रातल्या राजकारणाला अर्थात राष्ट्रवादीला छेद देण्यासाठी गुगली टाकली आहे. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यात संघर्षाची ठिणगी पडली आहे एवढं मात्र निश्चित आहे.

Leave a Comment