चोर झाले शिरजोर

केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टी या पक्षाला कोणाकडून निधी मिळतो याची चौकशी केली जाईल अशी घोषणा केली आहे. अशा प्रकारची चौकशी कॉंग्रेसचीसुध्दा व्हावी आणि कॉंग्रेसला कोणाकडून पैसे मिळतात हे जनतेला कळावे म्हणून राजकीय पक्षांचे हिशोब माहितीच्या अधिकाराच्या कक्षेत असावेत अशी मागणी करणारी एक याचिका एका व्यक्तीने दाखल केली होती. तिचा निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने राजकीय पक्षांनी आपले हिशोब जनतेला सादर करावेत असा निर्देश दिला. परंतु देशातल्या कोणत्याही राजकीय पक्षात असा हिशोब सादर करण्याची हिंमत नाही. त्यामुळे या सगळ्यांनी एकत्र येऊन सर्वोच्च न्यायालयाचा निकाल निष्प्रभ करणारा कायदा केला आणि राजकीय पक्षांचा हिशोब कोणी मागणार नाही असा नियमच करून टाकला. त्यात सुशीलकुमार शिंदेही समाविष्ट होते. जो कॉंग्रेस पक्ष आपल्या निधीतले काळेबेरे झाकण्याचा प्रयत्न करत आहे. तो पक्ष आपले हिशोब सादर करणार्‍या आम आदमी पार्टीला मात्र त्यांना कुणाकडून निधी मिळतो हे दरडावून विचारत आहे आणि न सांगितल्यास कारवाई करण्याची धमकी देत आहे. चोर शिरजोर झाले आहेत आणि सभ्य माणसाला दरडावत आहेत. हा आपल्या देशातल्या भ्रष्ट कारभाराचा दुर्दैवी परिपाक आहे.

काचेच्या घरात राहणार्‍यांनी दुसर्‍यांच्या घरावर दगड ङ्गेकू नयेत अशी एक इंग्रजी म्हण आहे. ही म्हण आज कॉंग्रेस पक्षाला सांगण्याची गरज आहे. कारण ती तशी सांगावी अशी नेमकी परिस्थिती निर्माण झालेली आहे. केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे काही बोलायला लागले की एवढ्या अविचाराने बोलतात की त्या बोलण्याचे परिणाम काय होतील याची त्यांना काळजी नसते. त्यांनी काल आम आदमी पार्टीला आपल्या हातातल्या सत्तेचा बडगा दाखवण्याचा प्रयत्न केला. असा बडगा दाखवून आपल्या प्रतिस्पर्ध्यांना शांत करणे ही कॉंग्रेसची कार्यशैलीच राहिलेली आहे. शिंदेसाहेबांनी काल आम आदमी पार्टीच्या परदेशातून आलेल्या निधीचा मुद्दा उपस्थित केला. अरविंद केजरीवाल यांच्या या पार्टीला परदेशातून निधी मिळत आहे आणि त्यासंदर्भात आपल्याकडे तक्रार आलेली असून त्याची चौकशी केली जाणार आहे असे पिल्लू त्यांनी काल सोडून दिले. आतापर्यंत असा प्रयोग त्यांनी मुलायमसिंग यादव आणि मायावती यांच्यावर केला होता. परंतु त्यांच्यावर या धमकीचा परिणाम झाला. कारण हे दोन्ही नेते भ्रष्ट आहेत. त्यांचे हात स्वच्छ असते तर त्यांनी केंद्र सरकारच्या चौकशांना भीक घातली नसती.

पण हात स्वच्छ नसल्यामुळे त्यांना गप्प बसावे लागले आणि सतत अस्थीर असलेल्या केंद्र सरकारला ते पाठिंबा देत गेले. आता दिल्लीमध्ये विधानसभा निवडणुकीची गजबज चाललेली आहे आणि अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीचा बराच बोलबाला होताना दिसत आहे. आम आदमी पार्टीला निवडणूक आयोगाने झाडू हे चिन्ह दिले आहे. पण हा झाडू एवढा प्रभावीपणे ङ्गिरायला लागला आहे की त्याचे मानसिक खच्चीकरण केल्याशिवाय दिल्लीतली सत्ता आपल्या हाती राहणार नाही याची जाणीव कॉंग्रेसला झाली आहे. सुशीलकुमार शिंदे यांच्याकडे आम आदमी पार्टीच्या परदेशातून आलेल्या निधीबद्दलची तक्रार कोणी दाखल केली आणि कधी दाखल केली याचे तपशील काही कळले नाहीत. परंतु अशी तक्रार हाती आल्याबरोबर शिंदे साहेबांनी तिची चौकशी करण्याची ताबडतोब घोषणा केली. रॉबर्ट वड्रा यांच्या विरोधात तक्रारी येऊन वर्षे उलटून गेली. त्यांनी केलेला भ्रष्टाचार खरासुध्दा आहे पण त्याची चौकशी करण्याची एवढी तत्परता शिंदे साहेबांना दाखवता आली नाही. आता मात्र ही तत्परता दाखवली. चौकशी करतो म्हटल्याबरोबर माणूस घाबरतो. पण अरविंद केजरीवाल हा काही सामान्य माणूस नाही. शिंदे साहेबांना हे लक्षात आले नाही. केजरीवाल यांच्याकडून कसले उत्तर येईल याचा त्यांना अंदाजही आला नाही. पण आले ते उत्तर तिखट होते.

आपल्या पक्षाच्या निधीच्या प्रत्येक रुपयाचा हिशोब आपण द्यायला तयार आहोत आणि तो दिलेलाही आहे. नुसता दिलेला आहे असे नाही तर तो कोणालाही वाचता येईल अशा वेबसाईटवर टाकलेला आहे. पक्षाकडे आलेल्या एखाद्या रुपयाचा हिशोब त्या वेबसाईटवर दिसला नाही तर कोणीही आपल्याशी संपर्क साधू शकतो आणि आपण त्याचे उत्तर द्यायला तयार आहोत असे केजरीवाल यांनी म्हटले आहे. ज्याचे चारित्र्य चांगले असते तो कोणालाच घाबरत नाही. केजरीवाल यांचे तसेच आहे. त्यांनी आपल्या निधीचा तर पूर्णपणे पारदर्शक व्यवहार दाखवून दिला आहेच पण सुशीलकुमार शिंदे यांना असा बिनतोड सवाल केला आहे की त्यांच्या पक्षाने आपल्या सारखा वेबसाईटवर हिशोब देऊन दाखवावा. यावर सुशीलकुमार शिंदे एका शब्दानेही प्रत्युत्तर देऊ शकले नाहीत. कारण त्यांचा पक्ष भ्रष्टाचारात एवढा लडबडलेला आहे की कोणाकडेही नैतिक धैर्याने मान ताठ ठेवून बोलण्याची त्यांची हिंमत नाही. ही अवस्था केवळ कॉंग्रेसचीच आहे असे नाही. भाजपा, राष्ट्रवादी, समाजवादी, बसपा सगळ्याच पक्षांच्या निधीचे हिशोब गोलमाल आहेत.

Leave a Comment