काँग्रेस हायकमांडने पाठविलेले पृथ्वी मिसाईल सपशेल अपयशी – विनोद तावडे

मुंबई – मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्याचे मुख्यमंत्रीपद स्वीकारलेल्या कार्यकाळाला 3 वर्षे झाली. परंतु या काळात त्यांनी आपले सहकारी राष्ट्रवादी काँग्रेसला अडचणीत आणणे याखेरीज कोणतेही काम केले नाही. त्यामुळे काँग्रेस हायकमांडने दिल्लीहून पाठविलेले हे पृथ्वी मिसाईल सपशेल अपयशी ठरले आहे, अशी टीका विधानपरिषदचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी आज पत्रकारांशी बोलताना केली.

मेट्रो, मोनो तसेच आपली आवडती स्वप्नातील कल्पना सागरी महामार्ग यापैकी कोणतेही काम ते पूर्ण करू शकले नाहीत. शेतकरी आत्महत्या, दुष्काळग्रस्तांना दिलासा, पायाभूत सुविधा, मंत्रालय पुनर्विकास भ्रष्टाचार, विविध खात्यातील समन्वयाचा अभाव, एमएमआरडीए व एमएसआरडीसी यातील वाद मिटविणे या सर्व आघाड्यावर मुख्यमंत्री अपयशी ठरले आहेत. असे ते म्हणाले.

महिला अत्याचाराच्या प्रमाणात वाढ, मुंबई हल्ल्याला पाच वर्षे होऊनही मुंबईत सीसीटीव्ही बसविण्याचा टक्केवारीत अडकलेला प्रकल्प, वरीष्ठ पोलीस अधिकार्‍यांच्या रखडलेल्या बदल्या, आदर्श अहवाल मांडण्यास विलंब, जलसंपदा भ्रष्टाचाराच्या कमिशन ऑफ इनव्क्वायरी अ‍ॅक्टनुसार चौकशीस नकार, चारा डेपो भ्रष्टाचाराकडे दुर्लक्ष, गृहनिर्माण धोरण कागदावर अशा सर्वच व विकासाच्या वाटेवर नेणार्‍या योजना सोडविण्यात मुख्यमंत्र्यांना यश आलेले नाही. याकडे तावडे यांनी लक्ष वेधले. गेल्या 3 वर्षात आदिवासी खात्यात प्रचंड भ्रष्टाचार झाला आहे. न्यायालयाने ताशेरे ओढूनही दोषी अधिकारी व मंत्री यांच्यावर कारवाई केली नाही, असेही ते म्हणाले.

Leave a Comment