एकाकीपणा विसरण्यासाठी करा खरेदी – चीनमध्ये नवी टूम

बिजिंग – वर्षभरात विवाह योग जुळून न आल्याने यंदाही आपण अविवाहित राहिलो या विचारात चीनमधील तरूण ११ नोव्हेंबर हा दिवस मद्य घेऊन उदासपणे घालवितात कारण येथे तशी प्रथाच आहे. हा अनधिकृतपणे सुटीचाच दिवस असतो. मात्र दुकानदार कशाचे भांडवल करतील आणि आपला माल खपवतील हे सांगणे ब्रह्मदेवालाही अशक्य. तसाच कांहीसा प्रकार चीनमध्येही घडतो आहे. कारण ११ नोव्ंहेंबरचा हा दिवस वास्तविक नैराश्यात जायला हवा तो आता जगातील सर्वात मोठा ऑनलाईन खरेदी दिवस म्हणून बदलू पाहात आहे. यंदाचा ११ नोव्हेंबरही त्याला अपवाद नसून या दिवशी चीन्यांनी तब्बल ५.७५ अब्ज डॉलर्स ऑनलाईन खरेदीवर खर्च केले आहेत असे आकडेवारी सांगते.

अलिबाबा या ऑनलाईन विक्री साईटच्या मालकीच्या असलेल्या टी मॉल व अन्य इ कॉमर्स साईटनी या दिवसांला सिंगल डे असे नांव दिले आहे. ११/११ हा दिवस म्हणजे ११ नोव्हेंबरचा दिवस. यात चार वेळा १ आकडा येतो. १ म्हणजे सिंगल. या कंपनीने याचेच भांडवल करून पाच वर्षांपूर्वी या दिवशी ऑनलाईन खरेदी वाढावी यासाठी खास प्रयत्न केले असून त्याला चांगले यशही आले आहे. यंदा तर या साईटला ४ कोटी अविवाहीत पुरूषांनी भेट दिली व कंपनीने १ कोटी ५२ लाख पार्सल्स शिपिंगसाठी तयार ठेवली होती. विशेष म्हणजे दोन कोटी अविवाहित चिन्यांनी या दिवशी लंचपूर्वीच जोरदार खरेदी केल्याचे आकडेवारीवरून दिसून आले.

फोरेस्टर रिसर्चनुसार यंदा चिनी ऑनलाईन खरेदीत अमेरिकेलाही मागे टाकणार आहेत. कारण यावर्षात चिन्यांनी २९० अब्ज डॉलर्सची ऑनलाईन खरेदी केली असून त्यातील साडेपाच अब्ज डॉलर्सची खरेदी तर ११ नोव्हेंबर या एकाच दिवसांत झाली आहे. अमेरिकेत यंदा २६० अब्ज डॉलर्सची ऑनलाईन खरेदी केली गेली आहे.

चीनमध्ये २०१३ ते २०१५ या काळात ऑनलाईन खरेदीत ३२ टक्के वाढ होण्याचा अंदाज वर्तविला गेला असून टी मॉलच्या सहाय्याने नाईके, आदिदास, प्रॉक्टर अॅन्ड गँबल, युनिलिव्हर व सॅमसंग या कंपन्यांनीही आपली उत्पादने ऑनलाईन खरेदीसाठी उपलब्ध करून दिली होती असेही समजते.

Leave a Comment