सर्व्हर बिझी, सचिनचे चाहते नाराज

मुंबई – सचिन तेंडुलकरच्या 200 व्या अंतिम कसोटीचे ऑनलाईन तिकिट विक्री आज सकाळी 11 वाजता वेबसाईटवर सुरू झाली आहे. मात्र या वेबसाईटचा सर्वर बिझी दाखवत असल्याने सचिनच्या चाहत्यांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे.

तिकीट विक्री कमी ठेवल्यामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण पसरले असून क्रिकेट प्रेमींनी वानखेडे स्टेडिअमवर गोँधळ घातला आहे. सकाळी 11 वाजल्यापासुनच ऑनलाईन तिकीट विक्री सुरू करण्यात आली परंतु एकाच वेळी लाखो लोकांनी या वेबसाईटवर तिकिट मिळवण्यासाठी गर्दी केल्याने या वेबसाईटचा सर्वर बंद पडला आहे. वानखेडे स्टेडिअमची आसन क्षमता 32 ते 33 हजार एवढी आहे. मात्र या ऐतिहासिक कसोटी सामन्याची फक्त साडे तीन ते चार हजार तिकिटेच सामान्यांसाठी उपलब्ध असणार आहेत. त्यामुळे सर्व क्रिकेटप्रेमींनी तिकिट विक्री सुरु होताच दिलेल्या वेबसाईटवर गर्दी केली.

एकाच वेळी लाखो लोकांनी या वेबसाईटला भेट दिल्याने या वेबसाईटचा सर्व्हर बिझी दाखवत आहे. 14 ते 18 नोव्हेंबरदरम्यान वानखेडे स्टेडिअमवर खेळली जाणारी कसोटीची तिकिटे आज सकाळी 11 वाजता वितरीत करण्यात येणार होती. सचिनची ही 200 वी कसोटी असून या कसोटीनंतर आपण क्रिकेट विश्वातून निवृत्त होणार असल्याची घोषणा खुद्द सचिननेच केली होती. तसेच आपली ही कसोटी आपल्या घरच्या मैदानावर म्हणजेच वानखेडे स्टेडिअमवर व्हावी अशी इच्छा सचिनने एमसीएकडे व्यक्त केली होती.

त्यानंतर एमसीएने हा सामना वानखेडे स्टेडिअमवर घेण्याचा निर्णय घेतला होता. याच सामन्याच्या तिकीटांची आज विक्री होणार होती. या कसोटी सामन्याच्या तिकिटांचे वैशिष्ट्य म्हणेज या तिकिटांवर सचिनच्या सन्मानार्थ त्याचा फोटा आणि त्याच्या शतकी खेळांचा स्कोअर छापलेला आहे. परंतु हे तिकिट मिळवण्यासाठी त्याचे चाहते उत्सूक असताना वेबसाईट बिझी असल्यामुळे अनेक चाहत्यांच्या उत्साहावर पाणी फिरले आहे.