किरणोत्सवाच्या अखेरच्या दिवशी किरणे महालक्ष्मीच्या गळ्यापर्यंतच

कोल्हापूर – किरणोत्सवाच्या अखेरच्या दिवशी मावळतीच्या सूर्यनारायणाची सोनेरी किरणे करवीर निवासिनी श्री महालक्ष्मीच्या गळ्यापर्यंतच येऊन पोचली. अडथळ्यांमुळे किरणे देवीच्या मुखापर्यंत येऊ शकली नाहीत. त्यामुळे असंख्य भाविकांची निराशा झाली. महालक्ष्मीच्या मूर्तीवर आलेली किरणे एक मिनिटे मूर्तीवर स्थिरावली.

मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात तब्बल चार वर्षांनी किरणोत्सव पूर्ण क्षमतेने झाला होता. 9 व 10 नोव्हेंबर रोजी किरणे देवीच्या मुखापर्यंत येऊन पोचली होती. किरणोत्सव आज पूर्ण क्षमतेने होऊन किरणे मूर्तीच्या मुखापर्यंत पोचतील, या आशेने भाविकांनी आज मंदिरात पाच वाजल्यापासूनच गर्दी केली होती. आंबा माता की जय, बोलो दुर्गा की जय च्या जयघोषात हा नयनरम्य सोहळा असंख्य भाविकांनी आपल्या अंतकरणी साठवून ठेवला.

दक्षिणायनातील किरणोत्सवाच्या अखेरच्या दिवशी (सोमवारी ) सूर्याची किरणे मूर्तीच्या गळ्यापर्यंत येउन पोचली. सूर्यकिरणांनी 5 वा.26 मिनिटांनी कासव चौकात प्रवेश केला. 5 वा.32 मिनिटांनी पितळी उंबर्‍यापर्यत पोचली. 5 वा.33 मिनिटांनी किरणांनी गाभार्यात प्रवेश केला. यानंतर किरणे पुढे सरकत सरकत 5 वा.34 मिनिटांनी मुख्य गाभार्यात प्रवेश केला, तर 5 वा. 37 मिनिटांनी किरणे पहिल्या आणि 5 वा. 38 मिनिटांनी दुसर्‍या पायरीवर, तर 5 वा. 39 मिनिटांनी तिसर्‍या पायरीवर पोचली.

5 वाजून 41 मिनिटांनी किरणे कटांचलापर्यंत येऊन पोचली. 5 वा. 42 मिनिटांनी किरणांनी महालक्ष्मीचा चरणस्पर्श केला. चरणस्पर्श केलेली ही किरणे 5 वा. 44 मिनिटांपर्यंत मूर्तीच्या कमरेपर्यंत येऊन पोचली. 5 वा.46 मिनिटांनी किरणे मूर्तीच्या गळ्यापर्यंत येऊन पोचली. त्यानंतर तब्बल एक मिनिटे किरणे मूर्तीवर स्थिर राहून डाव्या बाजूने लुप्त झाली.

Leave a Comment