
पुणे – जर्मन कार कंपनी फॉक्सवॅगनने भारतातून आता मेक्सिकोतही निर्यात सुरू केली असून मध्यम आकाराची सेदान श्रेणीतील वेंटो मेक्सिकोत निर्यात केली जात आहे. कंपनीच्या पुणे प्रकल्पात बनत असलेल्या गाड्या यापूर्वीच आशियाई आणि आफ्रिकी बाजारात निर्यात होत आहेत असे कंपनीचे अध्यक्ष महेश कोदुमुदी यांनी सांगितले. ते म्हणाले डाव्या बाजूला ड्रायव्हीग व्हिल असलेली वेंटो मेक्सिकोला निर्यात केली जात असून ही निर्यात वाढली आहे. निर्यात होत असलेल्या दर दोन गाड्यांमागे १ वेंटो गाडी आहे. पुणे प्रकल्पातून आक्टोबर २०१३ पर्यंत २७ हजारांहून अधिक गाड्या आशिया व आफ्रिकेत निर्यात केल्या गेल्या आहेतच पण वेंटोच्या रूपाने कंपनीने आता उत्तर अमेरिकेतील बाजारात प्रवेश केला आहे. पोलो आणि वेंटो यांची निर्यात वास्तविक २०११ मध्येच प्रथम सुरू झाली असली तरी मेक्सिको हे आमच्यासाठी सर्वात मोठे मार्केट ठरले आहे. कंपनी सध्या तीन महाद्विपातील ३२ देशांत गाड्या निर्यात करत आहे.
