चलनी नोटांवर कांही लिहिताय ? सावधान !

मुंबई – चलनी नोटांवर आकडे लिहिणे, सह्या करणे, अन्य मजकूर लिहिणे, खुणा करणे असल्या सवयी भारतीयांच्या अंगी बाणल्या आहेत. मात्र आता यापुढे असला कोणताही प्रकार करताना सावध रहा. कारण अशा कोणत्याही प्रकारच्या खुणा नोटांवर आल्या तर त्या नोटा चक्क रद्दीत जाणार आहेत. त्या नोटा बाजारातही चालणार नाहीत अथवा बँकातूनही घेतल्या जाणार नाहीत. रिझर्व्ह बँकेचे स्वच्छ नोटा अभियानातंर्गत हा निर्णय घेतला असून त्याची अम्मलबजावणी १ जानेवारी २०१४ पासून सुरू होणार आहे.

रिझर्व्ह बॅंकेने वास्तविक ही योजना ७ नोव्हेंबर २००१ सालातच लागू केली होती. मात्र असा कांही ना कांही मजकूर असलेल्या नोटांची संख्या इतकी प्रचंड होती की त्या चलनातून काढणे अशक्य बनले होते मात्र आता पुन्हा एकदा ही योजना राबविली जाणार असून त्यासंबंधीचे निर्देश सर्व बँकांना दिले गेले असल्याचे स्टेट बँकेतील अधिकार्‍यानी सांगितले. ते म्हणाले की कांहीही लिहिलेल्या नोटा आल्या तर त्या वेगळ्या ठेवण्यासंबंधीच्या सूचना सर्व बँकांना दिल्या गेल्या आहेत. पिना मारलेल्या नोटाही वेगळ्या काढण्याच्या सूचना असून या नोटा पुन्हा चलनात येणार नाहीत. ग्राहकांना त्यामुळे नवीन व स्वच्छ नोटाच मिळणार आहेत तसेच ग्राहकांकडूनही खुणा केलेल्या नोटा स्वीकारल्या जाणार नाहीत असेही ते म्हणाले.

Leave a Comment