मनमोहनसिंग जगातील प्रभावशाली शिख

लंडन – जगातील सर्वाधिक प्रबळ आणि प्रभावशाली १०० शिखांमध्ये भारताचे पंतप्रधान मनमोहनसिंग यांना प्रथम स्थान देण्यात आले आहे. शिख डिरेक्टरी या संस्थेचे त्यांच्या ‘ शिख १००‘ या नावाने प्रथमच प्रकाशित केलेल्या वार्षिक अहवालात ८१ वर्षीय मनमोहन सिग यांना प्रथम स्थान देताना त्यांची वैचारिक तसेच बौद्धिक पातळी आणि कामाबद्दल असलेली त्यांची तळमळ, शैक्षणिक दृष्टीकोन, उच्च पद भूषवितानाही असलेली विनम्रता यामुळे मनमोहनसिंग जगातील सर्वात प्रभावशाली शिखांमध्ये अव्वल असल्याचे म्हटले आहे. शिख जमातीत मनमोहनसिंग अतिशय सन्माननीय व्यक्ती असल्याचेही यात नमूद केले गेले आहे. योजना आयोगाचे माँटेकसिंग अहलुवालिया यांना या यादीत दुसरे स्थान देण्यात आले आहे.

मनमोहनसिंग यांच्या पत्नींना या यादीत १३ वे स्थान दिले गेले आहे तर श्री अकाल तख्तसाहिब चे प्रमुख जत्थेदार सिंहसाहिब गियानी गुरबचनसिह यांना तिसरे स्थान दिले आहे. पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल चौथ्या स्थानावर आहे तर उपमुख्यमंत्री सुखबीरसिंग चौदाव्या स्थानावर आहेत. क्रिकेटिअर हरभजनसिंग याला या यादीत २८ वे स्थान दिले गेले आहे. ही यादी कालच प्रकाशित करण्यात आली आहे.