एकनाथ खडसेना विरोधी पक्ष नेतेपदावरून डच्चू?

मुंबई – आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर भाजपचे एकेकाळचे फायरब्रँड नेते म्हणून ओळख असलेले एकनाथ खडसे पक्षाच्या मर्जीतून उतरले असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. खडसे यांच्याकडे सध्या असलेले विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेतेपद काढून घेतले जाणार असून राज्यात निवडणूक प्रचाराची जबाबदारी त्यांच्यावर दिली जाणार असल्याचे वरीष्ठ भाजप नेत्यांकडून समजते. नवीन विरोधी पक्ष नेतेपदाची घोषणा या वर्षअखेर करण्यात येईल असेही सांगितले जात आहे.

या पदासाठी भाजपचे राज्य अध्यक्ष मुनगंटीवार प्रबळ दावेदार मानले जात आहेत मात्र देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राज्य प्रदेशाध्यक्षपद आहे व हे दोघेही विदर्भातले असल्याने ही दोन्ही महत्वाची पदे विदर्भाला मिळणे अवघड असल्याचे कांही जणांचे म्हणणे आहे. खडसे यांच्यावर सिंगापूर येथे नुकतीच मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रिया झाली आहे. त्यांचे गुडघेही त्रास देत आहेत व त्यामुळे त्यांना आणखी किमान दोन महिने तरी विश्रांती घ्यावी लागणार असल्याचे भाजपकडून सागितले जात आहे मात्र खरे कारण काही वेगळेच असल्याचे समजते.

खडसे यांचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याबरोबर वाढत चाललेल्या घनिष्ट संबंधांची दखल भाजपने गंभीरपणे घेतली असून राज्यात युतीला सत्ता मिळण्याची शक्यता अधिक असताना कोणताही धोका भाजप पत्करणार नाही. सत्ताधारी पक्षाला त्यांच्या चुकीच्या धोरणांवरून धारेवर धरण्याऐवजी खडसे समझोत्यांवर अधिक भर देत असल्याचा आक्षेपही काही वरीष्ठ नेत्यांनी पक्षश्रेष्ठीकडे नोंदविला आहे. राज्यात सध्या काँग्रेस विरोधी लाट असताना त्याचा हवा तसा फायदा विरोधी पक्ष घेत नाही अशीही कांही नेत्यांची तक्रार आहे.

विशेष म्हणजे मुख्यमंत्री चव्हाण यांनीही सर्व प्रोटोकॉल मोडून खडसे याच्या शस्त्रक्रियेनंतर त्यांच्या घरी जाऊन घेतलेली भेट व १ तासभर मारलेल्या गप्पा यामुळेही भाजप नेत्यांच्या भुवया उंचावल्या गेल्या आहेत. खडसे यांची ही वर्तणूक मोदी यांचे पंतप्रधानपदाचे स्वप्न भंग करण्यास कारणीभूत ठरू शकते असाही विचार मांडला जात आहे. खडसे यांच्या विरोधात यापूर्वीही अशा प्रकारचे वाद निर्माण झाले असून ते काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांना विरोध करण्याऐवजी सेटलमेंटवर भर देत असल्याचा आरोपही केला जात आहे.

Leave a Comment