आपली रेषा मोठी करणारे मुख्यमंत्री

सध्या महाराष्ट्रात पृथ्वीराज चव्हाण यांच्या मुख्यमंत्रीपदाला तीन वर्षे पूर्ण होत असल्याने त्यांच्या कामाविषयी चांगले बोलले जात आहे. त्यांनी आपली स्वत:ची एक प्रतिमा निर्माण केली आहे. ते महाराष्ट्रात आले तेव्हा ते कधीकाळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून येतील अशी कल्पनाही कोणी केली नव्हती. पण तसे झाले. काहींना आश्‍चर्य वाटले आणि काहींना हेवा वाटला. कसलीही लॉबिंग न करता किंवा सध्याच्या काळात लोक मुख्यमंत्री होण्यासाठी जे जे करतात ते काहीही न करता चव्हाणांना या पदाची लॉटरी लागली याचा काहींना हेवा वाटला. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर टपून बसलेल्या नेत्यांची संख्या निदान डझनभर तरी असावी. यातल्या काही लोकांनी तर, आता बघतोच हे साहेब कसा कारभार करतात ते, अशा छद्मीपणाने त्यांच्या कामाकडे पहायला सुरूवात केली. काही लोकांनी त्यांच्या कामात अडथळे आणले. काहींनी त्यांना सावकाश काम करणारा मुख्यमंत्री म्हणून हिणवायलाच नाही तर त्यांची तशी प्रतिमा तयार करायला सुरूवात केली. कॉंग्रेसची एक पद्धत आहे. या पक्षातले नेते एखाद्याला मोठया हौसेने मुख्यमंत्री करतात आणि त्याला शपथ घेऊन एखादा आठवडाही होत नाही तोच त्याच्याविरोधात कारवाया करायला सुरूवात करतात. त्याला घालवण्यासाठी दिल्लीला शिष्टमंडळे पाठवायला लागतात.

दिल्लीतले कॉंग्रेसश्रेष्ठी नेहमीच राज्यात दोन गट निर्माण करून त्यांना परस्पराच्या विरोधात झुंजवत ठेवत असतात. त्यामुळे कागाळ्या करणार्‍या गटालाही ते गोंजारतात आणि मग मुख्यमंत्र्यांना दिल्लीत जाऊन पक्षश्रेष्ठींकडे सङ्गाई द्यावी लागते. या भानगडीत त्याचे कारभाराकडे लक्षच लागत नाही. परंतु पृथ्वीराज चव्हाण असे सुदैवी मुख्यमंत्री निघाले की त्यांना दिल्लीच्या नेत्यांनी पूर्णपणे विश्‍वास दिला. मुख्यमंत्री हटाव मोहिमेत नेहमी अग्रभागी असणार्‍या असंतुष्ट नेत्यांना कधी विचारलेच नाही. त्यामुळे पृथ्वीराज चव्हाण यांना शांतपणे आपला कारभार करता आला. त्यातून त्यांना मिळालेला आत्मविश्‍वास त्यांनी महाराष्ट्राची बिघडलेली प्रशासकीय घडी बसवण्यासाठी कामाला लावला आणि बघता बघता महाराष्ट्रात बरीच कामे मार्गी लागायला लागली. राज्याच्या कारभारातला सावळा गोंधळ बराच कमी झाला. मुख्यमंत्र्यांचा स्वभाव ङ्गार वेगळा आहे. हातात मुख्यमंत्रीपदाची सूत्रे येताच आपल्या भोवती आरत्या ओवाळणार्‍यांचा संप्रदाय निर्माण करणे आणि सातत्याने उदो उदो करणारे कार्यक्रम निर्माण करणे असा सवंगपणा त्यांच्या स्वभावात नाही. त्यामुळे स्वतःचे महत्त्व वाढविण्यापेक्षा त्यांनी कामात लक्ष घातले.

राष्ट्रवादी कॉंग्रेस हा त्यांचा मित्र आणि घटक पक्ष पण या घटक पक्षाने मुख्यमंत्र्यांची प्रतिमा बिघडवून आपले वजन वाढविण्याचा प्रयत्न सुरू केला. नीतीशास्त्रामध्ये नेहमीच एक गोष्ट सांगितली जाते की एखाद्या दुसर्‍या माणसाला आपण सातत्याने मूर्ख म्हणायला लागलो तर लोक आपल्याला शहाणे म्हणत नसतात. लोकांनी आपल्याला शहाणे म्हणावे असे वाटत असेल तर त्या प्रतिस्पर्धी माणसापेक्षा आपण अधिक शहाणपणाने वागले पाहिजे. ही गोष्ट मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या दोघांच्या स्पर्धेमध्ये ङ्गार जाणवली. नेहमी कसली तरी तिकडमबाजी करून आपण ङ्गार शहाणे आहोत, कार्यक्षम आहोत आणि मुख्यमंत्री अकार्यक्षम आहेत ही अजित पवारांची कायमची कार्यपध्दती राहिली. परंतु मुख्यमंत्र्यांनी त्यांना कधीही त्यांच्या भाषेत उत्तर दिले नाही. नियमात बसतील ती कामे आणि तीच कामे जमेल तेवढ्या वेगाने करणे आणि सरकारची प्रतिमा बदलवणे हे काम त्यांनी शांतपणाने केले. त्यांनी स्वतःची रेषा मोठी करून अजित पवारांची रेषा कशी लहान आहे हे जगाला दाखवून दिले. आज महाराष्ट्राला कित्येक वर्षांनी भ्रष्टाचाराचे आरोप नसणारा मुख्यमंत्री मिळाला आहे. पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर विरोधी पक्षसुध्दा भ्रष्टाचाराचा आरोप करू शकत नाहीत. मुख्यमंत्र्यांच्यामुळे कॉंग्रेसची प्रतिमासुध्दा सुधारली आहे.

महाराष्ट्रातले अनेक प्रश्‍न मार्गी लावताना त्यांनी भ्रष्टाचारी लोकांना दुखावले. वैयक्तिक हितसंबंध गुंतलेली कामे वाकडी वाट करून मंजूर करून देण्याची खास कॉंग्रेसची शैली बदलून टाकली. राष्ट्रवादी कॉंग्रेसला काय वाटेल याची पर्वा न करता राज्याची अर्थव्यवस्था ताळ्यावर आणली. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या ताब्यात असलेल्या पण भ्रष्टाचारात लिप्त झालेल्या सहकारी बँकांचे उदाहरण या दृष्टीने पहाण्यासारखे आहे. अजित पवार यांच्या मनमानीमुळे तोट्यात गेलेली राज्य सहकारी बँक त्यांनी प्रशासकाच्या ताब्यात दिली. त्यामुळे हातातली सत्ता गेलेले संचालक मंडळ चरङ्गडले. या निर्णयाला त्यांनी राजकीय स्वरूप देण्याचा प्रयत्न केला. परंतु शेवटी त्यांचा निर्णय योग्य ठरला. एक हजार कोटी रुपये तोट्यात असलेली ही बँक ही आता ४०० कोटी रुपयांच्या नफ्यात आहे. शिवाय राज्यातल्या अन्यही पाच सहकारी बँका त्यांनी ताळ्यावर आणल्या. सध्या देशाच्या राजकारणात बिल्डर लॉबी ङ्गार प्रभावी ठरली आहे. परंतु पृथ्वीराज चव्हाण यांनी या बिल्डर लॉबीलासुध्दा ताळ्यावर आणले आहे. निव्वळ प्रशासकीय सुधारणांच्या माध्यमातून त्यांनी हे घडवले आहे.

Leave a Comment