हैदराबाद – भारतीय जनता पार्टीचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा कट आंतरराष्ट्रीय पातळीवर रचला जात असून त्याला पाकिस्तानातून मदत मिळत आहे आणि भारतातल्या ज्या लोकांना मोदी पंतप्रधान नको आहेत त्यांचे अप्रत्यक्ष सहकार्यही मिळत आहे, असा गंभीर आरोप भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते एम. व्यंकय्या नायडू यांनी काल पत्रकारांशी बोलताना केला.
मोदी पंतप्रधान झाल्यास ते देशातला दहशतवाद खंबीरपणे संपवून टाकतील अशी भीती दहशतवादी संघटनांना वाटत आहे. त्यामानाने कॉंग्रेसचे दहशतवादविरोधी धोरण मिळमिळीत आणि संभ्रमित अवस्थेतले आहे. त्यामुळे दहशतवादी संघटनांना नरेंद्र मोदी पंतप्रधान नको आहेत, असे व्यंकय्या नायडू यांनी प्रतिपादन केले.
नरेंद्र मोदी यांच्या पाटण्यातील सभेमध्ये प्रत्यक्षात पाच स्ङ्गोट झाले असले तरी नंतरच्या शोधामध्ये या मैदानात २३ बॉम्ब सापडले आहेत. या गोष्टीकडे व्यंकय्या नायडू यांनी पत्रकारांचे लक्ष वेधले. मोदींना संपविण्याचा हा कट एवढा व्यापक असतानाही राज्य सरकारने मात्र योग्य तपासणी केलेली नव्हती आणि अशी तपासाची हेळसांड करणार्या नितीशकुमार यांची कॉंग्रेसची चुंबाचुंबी सुरू झालेली आहे. या दोन्ही पक्षाला मोदी पंतप्रधान नको आहेत.
मुख्यमंत्री नितीशकुमार नेहमीच मोदींना पाण्यात पाहतात आणि कॉंग्रेसला तर आता सर्वत्र मोदीच दिसायला लागले आहेत. म्हणूनच कॉंग्रेसने मोदींच्या मागे सीबीआयचा लकडा लावून त्यांना बदनाम करण्याची मोहीम सुरू केली आहे. मोदींचा विकासाचा अजेंडा आणि खंबीर धोरणाची शाश्वती ही काही लोकांच्या मनात धडकी भरवणारी असल्यामुळे त्यांना कोणत्याही प्रकारे मोदींचा वारू रोखायचा आहे, असे व्यंकय्या नायडू म्हणाले.