27 नोव्हेंबरला दिसणार शतकातील सर्वात मोठा धूमकेतू!

मुंबई- शतकातील सर्वात मोठा धूमकेतू आयसॉनचे लवकरच दर्शन होणार आहे. 27 नोव्हेंबरला सूर्योदयापूर्वी 20 मिनिटे हा धूमकेतू दिसेल. त्यामुळे खगोलप्रेमींना धूमकेतू पाहाण्याची संधी मिळणार आहे. हा धूमकेतू 28 नोव्हेंबर रोजी आयसॉन सूर्याच्या अगदी जवळ येणार असून त्याचे सूर्याच्या पृष्ठभागापासूनचे अंतर 11 लक्ष 60 हजार किलोमीटर इतके असेल. सूर्याच्या जवळ आल्याने आयसॉन धूमकेतूचे तापमान दोन हजार अंश सेल्सिअस होणार आहे. त्यामुळे अंतराळात घडणार्‍या घडामोडींकडे शास्त्रज्ञांचे लक्ष आहे, असे ज्येष्ठ खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी म्हटले आहे.

यापूर्वी 1976 मध्ये वेस्ट, 1986 मध्ये हॅले, 1997 मध्ये हेलबॉय या धूमकेतूंनी दर्शन दिले होते. 21 सप्टेंबर 2012 यादिवशी नेवस्की आणि नोव्हीचोक्स या रशियन खगोल शास्त्रज्ञांनी आयसॉन धूमकेतूचा शोध लावला. त्यावेळी हा धूमकेतू शतकातील सर्वात मोठा धूमकेतू असल्याचा दावा या शास्त्रज्ञांनी केला होता. बर्फ, धुलीकण आणि वायू यांचा गोळा म्हणजे धूमकेतू. हे गोळे सूर्यमालेबाहेर येतात आणि सूर्याला प्रदक्षिणा करून जातात. ज्यावेळी हे गोळे मंगळ कक्षा ओलांडतात त्यावेळी त्यांना पिसारा फुटतो. या पिसार्‍याचे पृथ्वीवरून विलोभनीय दर्शन घडते.

Leave a Comment