कपिल शर्मा झळकणार आता सिनेमात

गेल्याण काही दिवसांपासून ‘कॉमेडी नाईट्स विथ कपिल’ या शोमुळे ख-याअर्थाने नावारूपाला आलेल्या् विनोदी अभिनेता कपिल शर्मा आता सिनेमात पदार्पण करणार असल्याचे समजते. एरवी आपल्या शोमधून रुपेरी पडद्यावरच्या कलाकारांची टोपी उडविणा-या कपिल शर्माने आपल्या शोच्याच टीमबरोबर नव्या सिनेमात जुळवाजुळव सुरू केली असल्याचे समजते.

विनोदी अभिनेता आणि एका शोचा सूत्रसंचालक म्हणून कपिल शर्माने चांगलीच लोकप्रियता मिळवली आहे. त्याच्या शोमध्ये आतापर्यंत बॉलिवूडच्या जवळपास सर्व आघाडीच्या कलाकारांनी हजेरी लावली आहे. शाहरूख खानने कपिलसोबत दोनदा कॉमेडी नाईट्स कार्यक्रमात रंगत आणली. त्यामुळे कपिलने जर सिनेमात काम करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केला तर त्याला संधी मिळणार नाही, असे होणार नाही.

कपिलला सिनेमा क्षेत्रातला अभिनयाचा श्रीगणेशा स्वत:च्या ताकदीवर बहुधा करायचा असावा. म्हणूनच त्याने बॉलिवूडच्या कोणत्याही प्रथितयश निर्माता-दिग्दर्शकाकडे भूमिकेसाठी विचारणा केलेली नाही. उलट ‘कॉमेडी नाईट्स विथ कपिल’ या शोचा दिग्दर्शक राजीव धिंग्रा याच्याबरोबर त्याने सिनेमाची जुळवाजुळव सुरू केली आहे. राजीव धिंग्रा यांनी ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’ या शोचे चौथे पर्व आणि कॉमेडी सर्कसचे काही शोज् दिग्दर्शित केले होते. आता कपिलच्या मदतीने तेही सिनेमा दिग्दर्शनात पदार्पण करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करीत आहेत. या सिनेमात कपिलबरोबर ‘कॉमेडी नाईट्स’मधील त्याचा सहकलाकार सुनील ग्रोव्हर याचीही भूमिका असणार आहे. कपिल आणि राजीव धिंग्रा हे खूप वर्षांपासून एकमेकांचे चांगले मित्र असल्यामुळे सिनेमासाठी त्याचीच मदत घेण्याचे कपिलने ठरविले असून एप्रिल अखेरीपर्यंत या सिनेमाच्या शुटिंगला सुरुवात होणार आहे.

Leave a Comment