ऊसाला 3 हजाराचा पहिला हप्ता द्या- खासदार शेट्टी

कोल्हापूर – जयसिंगपूरमध्ये आज 12 वी ऊस परिषद पार पडली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात ही परिषद घेण्यात आली. ऊसाला प्रतिटन 3000 रुपयांचा पहिला हप्ता विनाकपात देण्यात यावा, ही प्रमुख मागणी या ऊस परिषदेत करण्यात आली. तसंच रंगराजन समितीनं केलेल्या शिफारशींची तातडीनं अंमलबजावणी करण्यात यावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

राज्यात ज्या साखर कारखान्यांची विक्री झाली आहे, त्या कारखान्यांच्या चेअरमन आणि संचालकांची सीबीआय चौकशी करुन त्यांच्यावर आर्थिक गैरव्यवहारांचे गुन्हे दाखल करावेत यासह 10 ठराव यावेळी मंजूर करण्यात आलेत. जोपर्यंत 3 हजार रुपयांची उचल मिळत नाही तोवर आंदोलन सुरुच राहणार असंही यावेळी राजू शेट्टींनी म्हटलं आहे. 15 तारखेपासून मुख्यमंत्र्यांच्या कराड शहरातून आंदोलनाला सुरुवात होणार आहे. सातारा जिल्हा हे या आंदोलनाचं केंद्र असेल असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातले हजारो शेतकरी या ऊस परिषदेसाठी हजर होते.

Leave a Comment