स्तनपानाविषयी काही महत्वाचे…

लहान बालकांच्या वाढीमध्ये स्तनपान हा सर्वात निर्णायक घटक असतो. परंतु पहिल्यांदाच अपत्यप्राप्ती झालेल्या कित्येक विवाहितांना स्तनपानाच्या बाबतीत खूप शंका असतात. त्यातल्या त्यात बाळाला कसे पाजावे आणि आपल्या छातीत त्याला पुरे होईल एवढे दूध निर्माण होऊ शकेल का, या शंकांनी अशा नवमाता ङ्गारच त्रस्त झालेल्या असतात. परंतु याबाबतीत जागतिक आरोग्य संघटनेने मोठा सखोल अभ्यास केलेला आहे आणि काही सूचना दिलेल्या आहेत. स्तनपान हे मूल आणि आई या दोघांसाठी उपयुक्त असते. कारण त्यातूनच प्रेमाचे बंध निर्माण होत असतात. मुलांमध्ये रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यास आईचे दूध उपयुक्त असते आणि कोणत्याही मातेने किमान दोन वर्षे मुलाला आपले दूध पाजले पाहिजे, असे संघटनेने म्हटले आहे.

आईचे दूध बाळाला पुरेसे आहे की नाही, हे ठरवणार कसे? त्यावर जागतिक आरोग्य संघटनेने काही निकष सांगितलेले आहेत. बाळ जन्माला आल्यानंतरच्या १५ दिवसानंतर त्याचे वजन दर आठवड्याला १५० ते २०० ग्रॅमने वाढले पाहिजे. तसे ते वाढत असेल तर त्याला आईचे दूध पुरेसे आहे असे समजावे. कित्येक मातांना ही गोष्ट चमत्कारीक वाटेल, परंतु आपले बाळ दिवसातून किती वेळा शी आणि शू करते यावर त्याला दूध पुरते की नाही हे ठरत असते. त्याने दिवसभरामध्ये तीन ते चार वेळा शी केली पाहिजे. या गोष्टी जुन्या काळामध्ये सरावाने माहीत झालेल्या होत्या. परंतु आता अशा गोष्टी माहीत असलेल्या वृद्ध स्त्रियांचे मार्गदर्शन मिळत नाही. त्यामुळे मातांच्या मनात गैरसमज निर्माण होतात.

बाजारात सध्या कृत्रिमरित्या तयार केलेले दूध विक्रीला आलेले आहे. ते दूध कधी पाजावे? यावरही अनेक शंका-कुशंका असतात. परंतु तज्ज्ञांच्या मते हे वरचे दूध टाळलेच पाहिजे. काही मुलांना आईचे दूध ओढूृन घेता येत नाही. असे का होते? याला इतिहास असतो आणि डॉक्टर मंडळी याबाबतीत ते मूल कसे जन्माला आले याला महत्व देत असतात. नैसर्गिकरित्या प्रसूती झाली असल्यास हा प्रश्‍न येत नाही. परंतु तशी ती झाली नसल्यास काही मुलांच्या बाबतीत हा प्रश्‍न निर्माण होतो. तसा तो झाल्यास एका विशिष्ट प्रकारच्या मालिशने हा प्रश्‍न सोडवता येतो. त्यामुळे भारतामध्ये लहान मुलांच्या तेल लावण्याला आणि माखण्याला खूप महत्व दिलेले आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment