सोलापुरात विवेकानंद साहित्य संमेलन

सोलापूर – युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद यांच्या दीडशेव्या जयंतीवर्षानिमित्त ९ आणि १० नोव्हेंबर रोजी सोलापूरच्या ह. दे. प्रशालेच्या मैदानावर विवेकानंद साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती संमेलनाचे सहसमन्वयक प्रा. सुनिल कुलकर्णी यांनी दिली.

साहित्य संमेलन परिसराला विवेकानंदपुरम हे नाव देण्यात आले आहे. त्यात विवेकानंदांच्या जीवनावर प्रकाश टाकणारे चित्र प्रदर्शन मांडण्यात येणार आहे. नामवंत हिंदी साहित्यिक नरेंद्र कोहली हे या संमेलनाचे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत. या संमेलनास राज्यभरातून साडे सातशे प्रतिनिधी येणार असून अडीचशे स्थानिक प्रतिनिधी सहभागी होणार आहेत.

शनिवार, ९ रोजी सकाळी ८.१५ वाजता स्वामी विवेकानंद यांच्या भव्य मूर्तीसह ग्रंथदिंडी काढण्यात येणार आहे. स्वामी विवेकानंद यांच्या साहित्यावर होणारे हे भारतातील पहिलेच संमेलन आहे. सार्ध शती समारोह समिती, महाराष्ट्र प्रांताने आयोजिलेल्या या संमेलनाचे उद्घाटन बी.व्ही.जी. ग्रुप या स्वयंसेवी संघटनेचे अध्यक्ष हणमंतराव गायकवाड यांच्या हस्ते केले जाणार आहे. संमेलनात विवेकानंदांच्या जीवनावर आणि साहित्यावर प्रकाश टाकणारी भाषणे आणि परिसंवाद होणार असून त्यात देशातले नामवंत वक्ते सहभागी होणार आहेत.

संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे, राष्ट्रीय विचारांचे साक्षेपी अभ्यासक व लेखक तरुण विजय, स्वामी बुद्धानंद, अभिनेते राहुल सोलापूरकर यांच्यासह अनेक मान्यवर लेखक व विचारवंत या परिसंवादात सहभागी होतील. सायंकाळी विवेकानंदांवर आधारित सांस्कृतिक कार्यक्रम होईल.

Leave a Comment