सेलिब्रिटी शेफ पद्मश्री तरला दलाल यांचे निधन

मुंबई – सेलिब्रिटी शेफ पद्मश्री तरला दलाल यांचे बुधवारी दक्षिण मुंबईतील त्यांच्या निवासस्थानी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्या 77 वर्षांच्या होत्या. जगभरात सर्वाधिक खपाच्या पहिल्या पाच पाककला शास्त्र लेखकांमध्ये त्यांची गणना करण्यात येते.आजवर तरला दलालांनी 170 पाकशास्त्रावरच्या पुस्तकांचे लिखाण केले आहे.पाककलेत पारंगत असलेल्या तरला दलाल यांच्या रेसिपी देशभरातील खवय्यांना भुरळ घालणा-या ठरल्या. त्यांचा टीव्हीवरील तरला दलाल शो’ फारच गाजला.

शाकाहारी पदार्थ बनवण्यात तर त्यांचा हातखंडाच होता. पाककलेतील उत्तुंग कामगिरीबद्दल त्यांना 2007 मध्ये पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले होते.
दलाल यांनी 1966 पासून मुंबईत कुकिंग क्लासेस सुरू केले. 1974 मध्ये त्यांचे पहिले कुकबुक प्रकाशित झाले आणि तेथूनच त्या तमाम गृहिणी आणि आचा-यांसाठी मार्गदर्शक म्हणून पुढे आल्या. त्यांचे हे पुस्तक फारचे गाजले. त्यांच्या पहिल्या पुस्तकाच्या तब्बल दीड लाख कॉपी विकल्या गेल्या. त्यांची शंभरावर पुस्तके प्रकाशित झाली असून 30 लाख एवढ्या विक्रमी प्रतींची विक्री झाली आहे.

देशातील पहिल्या मास्टर शेफ असे सार्थ संबोधन त्यांना प्राप्त झाले ते काही उगाचच नव्हे.दलालांनी इंग्रजीत लिखाण केले असले तरी जवळपास सर्व भारतीय भाषांमध्ये त्यांची कुकरी बुक भाषांतरीत झाली आहेत. आणि इतकचे नव्हे तर डच आणि रशियन भाषेतही त्यांचा अनुवाद उपलब्ध आहे.आजवर त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांच्या एकत्रित 40 लाखांहून अधिक प्रतींची विक्री झाली आहे. तर देशातील 20 दशलक्ष घरांमध्ये त्यांच्या पाककृती तयार करण्यात आल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येतो. तरला दलालांच्या पुस्तकांची विक्री केवळ पुस्तकांच्या दुकानातच होते असे नव्हे, तर त्यांना व्हिडीओ लायब्ररी, खेळण्यांची दुकाने, बुटिक आणि सुपरमार्केट मध्येही प्रचंड मागणी आहे.

सोनीवर कुक इट अप विथ तरला दलाल हा कार्यक्रम तीन वर्षे चालला.तरला दलालांचा जन्म पुण्याचा, विवाहनंतर त्या मुंबईत आल्या आणि त्यांनी कुकरीचे क्लासेस सुरु केले. त्यांच्या क्लासेसला प्रवेश घेण्यासाठी वेटिंग लिस्ट असायची. इंडियन मर्चंट चेंबरने दलाल यांना 2005 साली वुमन ऑफ द इयरने तर भारत सरकारने 2007 साली पद्मश्री देऊन त्यांना सन्मानित केले.

Leave a Comment