सल्लूमियाच्या संस्थेच्या नावाखाली लाखोंची फसवणूक

वसई – दबंग सलमान खानच्या बिईंग ह्युमन या संस्थेच्या नावाखाली अनेकांना लाखोंचा गंडा घालणार्‍या एका लखोबाला मिरारोड पोलिसांनी गजाआड केलं आहे. या लखोबाने बिईंग ह्युमन संस्थेच्या नावाखाली आजपर्यंत अनेकांना फसवल्याचे चौकशीनंतर समोर आलं आहे. विशाल शाह असे या भामट्याचे नाव आहे. मिरा-भाईंदर परिसरात सलमान खानच्या बिईंग ह्युमन या संस्थेच्या नावाचा वापर करुन तो लोकांची फसवणूक करत होता.

कोणाला शंका येऊ नये, यासाठी तो एका आलिशान हॉटेलमध्ये राहत होता. होंण्डा सिटी कारमधून फिरत होता. काही दिवसांपूर्वी विशाल मिरारोडमधल्या विक्रम सिंग नावाच्या एका व्यक्तीच्या ऑफिसमध्ये गेला. विशालने स्वत:चा परिचय सलमान खानच्या बिईंग ह्यूमन संस्थेचे कर्मचारी अशी करून दिली. सलमान खानच्या या संस्थेच्या माध्यमातून मिनीरल वॉटर वितरीत करण्यात येत असल्यांचे त्याने सांगितले.

तसेच 50 बॉटल मिनीरल वॉटर आणि एक फ्रिज फक्त 950 रुपयांमध्ये देणार असल्याचेही सांगितले. पण, ही ऑफर कमी दिवसांसाठी असल्याने तुम्हाला लवकरच संस्थेचा फॉर्म भरायला लागेल असे सांगितले. त्यासाठी 950 रुपयेही भरायला सांगितले. त्यानंतर अंधेरीच्या लोखंडवालामध्ये सलमान खान सगळ्यांना भेटेल अशी थाप मारली. त्याप्रमाणे विक्रम सिंग यांच्या ओळखीच्या अनेकांनी 950 रुपये भरुन बिईंग ह्यूमनची मेंबरशीप आणि फ्रिज बुक केले. ठरलेल्या दिवशी सलमान खानला भेटायला जाण्यासाठी सर्वजण वाट पाहत बसले. पण ना विशाल आला ना सलमान. तेव्हा सर्वांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले.

संतापलेल्या नागरिकांनी परत विशालला फोन करून आणखी दहा फ्रिजचे बुकीगं करायचे असल्यांचे सांगितले आणि त्याला भेटायला बोलावले. पैशांची हाव सुटलेल्या विशालने या मागे काही प्लान असू शकतो, याचा साधा विचारही केला नाही. आणि पुन्हा एकदा विक्रमच्या ऑफिसमध्ये गेला. यावेळी जमलेल्या लोकांनी विशालला पकडून मिरारोड पोलिसांच्या हवाली केले.

Leave a Comment