बटाटाही महागला!

मुंबई- गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या भाववाढीमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना टोमॅटो व बटाट्यानेही हैराण केले आहे. या दोन्ही महत्त्वाच्या भाज्यांचे भाव वाढल्याने सामान्य नागरिक हवालदिल झाले आहेत.

सध्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (एपीएमसी) घाऊक बाजारात टोमॅटोचे भाव दहा किलोला 260 ते 400 रुपये आहेत. तर किरकोळ बाजारात हेच भाव 55 ते 65 रुपये किलो आहेत. सांगली, सातारा आणि नाशिक व इतर जिल्ह्यांतून टोमॅटोचे पीक घेतले जाते.

एपीएमसीमध्ये नोव्हेंबर ते जानेवारीदरम्यान गुजरातहून टोमॅटो येतात. मात्र या वर्षी गुजरातमध्ये पडलेल्या अवकाळी पावसामुळे व पुरामुळे तेथील टोमॅटोचे पीक नष्ट झाले आहे. सध्याच्या परिस्थितीत एपीएमसीत टोमॅटोच्या 70 ते 80 गाडयांऐवजी 40 ते 50 गाडया येत आहेत.

घाऊक बाजारात बटाटयाचे भाव 18 ते 20 रुपये तर किरकोळ बाजारात 22 ते 24 रुपये आहेत. एपीएमसीमध्ये मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, पंजाब येथून बटाटयाच्या 70 ते 80 गाडया येतात. मात्र बटाटयाची जुनी आवक संपल्याने भाव वाढले आहेत.

Leave a Comment