दिवेआगार येथील सुवर्ण मंदिराचा जीर्णोद्धार वादात

रायगड – दिवेआगर येथील सुवर्ण मंदिर जीर्णोद्धार भूमिपूजन आज जलसंपदा मंत्री सुनील तटकरे यांच्या हस्ते झाले असले, तरी दिवेआगर ग्रामस्थ पुन्हा भूमिपूजन करणार आहेत. ग्रामस्थ आणि विश्वस्तांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते श्याम सावंत यांना भूमिपूजनासाठी पाचारण केले आहे. त्यामुळे सुवर्णगणेश मंदिराचा जीर्णोद्धार वादाच्या वावटळीत सापडला आहे.

आजचे भूमिपूजन राष्ट्रवादी काँग्रसेचे भूमिपूजन आहे, असा आरोप विश्वस्तांच्या प्रतिनिधींनी केला आहे. दिवेआगर येथील सुवर्णगणेश मूर्तीच्या चोरीनंतर येथील पर्यटकांची संख्या कमी झाली. त्यानंतर ग्रामस्थांनी पर्यटन व्यवसाय पूर्ववत व्हावा म्हणून प्रयत्न केले. तटकरे यांनी मंदिराच्या पुनर्बांधणीसाठी मोठा निधी आणला, तसेच प्राचीन मंदिरासारखा महत्वकांक्षी आराखडा तयारही केला. विशेष न्यायालयाने मंदिराच्या कामाला हिरवा कंदील दाखवताच ग्रामपंचायतीने ग्रामसभा घेऊन 8 नोव्हेंबर रोजी भूमिपूजन करण्याचे ठरविले. मात्र तटकरे यांनी 7 तारखेलाच भूमिपूजन केले जाईल, असा निर्णय घेतला.

शासकीय यंत्रणा आणि ग्रामपंचायतीमधील काही सदस्यांच्या पाठबळावर भूमिपूजन कार्यक्रमही पार पाडला. दिवेआगर ग्रामपंचायतीचे उपसरपंच तसेच सुवर्णगणेश मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष विजय तोडणकर यांनी तटकरे राजकारण करत असल्याचा आरोप केला आहे. भूमिपूजनासाठी ग्रामस्थांना विश्वासात न घेतल्याचा दावा केला आहे, तर तटकरे यांनी कार्यक्रम पूर्वनियोजित असल्याचे स्पष्ट करत हात वर केले आहेत. या मंदिराचे जलसंपदा मंत्री सुनील तटकरे यांच्या हस्ते भूमिपूजन झाले असले, तरी दिवेआगर ग्रामस्थ पुन्हा भूमिपूजन करणार आहेत. त्यामुळे इतक्या दिवसांनी गावात आलेल्या आनंदावर पुन्हा विरजण पडते का काय? असा प्रश्न ग्रामस्थांसमोर उभा राहिला आहे.

Leave a Comment