उसाला कमी भाव घेणार नाही- खा. राजू शेट्टी

कराड- गतवर्षीपेक्षा कमी ऊस दर चालणार नाही. शेतकरी हिशोबाने पैसे मागण्यासाठी आंदोलन करीत असताना त्यांचे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला जात आहे. राज्यकर्त्यांनी आता शेतक-यांची चेष्टा केली तर आगामी काळात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी दिला आहे.

कराड तालुक्यात आयोजीत करण्यात आलेल्या शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी राजाभाऊ देशपांडे होते. यावेळी ह.भ.प. युवकमित्र बंडातात्या कराडकर, सदाभाऊ खोत यांची प्रमुख उपस्थिती होती. पुढे बोलताना खासदार राजू शेट्टी म्हणाले, ‘आमच्या बापजाद्यांनी पै-पै जमवून उभारलेली सहकारी साखर कारखानदारी निष्क्रीय राज्यकर्ते कवडीमोल दराने विकू लागलेत. शेतक-यांचा गळा घोटणारे राज्यकर्ते एक दिवस गजाआड होतील. चांगल्या प्रतीचा ऊस आम्ही देतो. उसाचा दर आधी ठरवा. मगच मूल्यांकनाची भाषा करा. सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये संगनमताने साखरेचा दर पाडला जातो. हे कारण दाखवून उसाचा दर कमी केला जातो, असा आरोपही त्यांनी केला.

सदाभाऊ खोत म्हणाले, ‘शेतक-यांना काय पाहिजे, याचा बोध मुख्यमंत्र्यांनी घ्यावा. शेतकरी व कारखानदारांच्यामध्ये मी पडणार नसल्याचे मुख्यमंत्री सांगत आहेत, हे त्यांना शोभत नाही. गेल्यावर्षी सातारा जिल्ह्यात आंदोलनावेळी पोलिसांनी अन्याय केला. परंतु, यावर्षी शेतकरी पत्रीसरकारची भूमिका घेणार आहे; यावर्षी प्रति टनाला २१०० रुपये घेतले तर पुढील वर्षी हा दर आणखी कमी होईल, असा इशाराही त्यांनी दिला.

Leave a Comment