इराण देणार क्रूड ऑईल किमतीत सूट

या वर्षात भारतीय रिफायनरीजनी इराणकडून मोठ्या प्रमाणात क्रूड खरेदी केले तर किमतीत सवलत देण्याची तसेच क्रूड ऑइलचे शिपिंग मोफत करण्याची तयारी इराणने दाखविली आहे. यंदाच्या वर्षात भारताने इराणकडून ११ दशलक्ष टन तेल आयातीच टार्गेट पुरे होऊ शकणार नाही असे यापूर्वीच जाहीर केले आहे त्यावर इराणने या सवलती देऊ केल्या आहेत. गतवर्षी भारताने १३.१ दशलक्ष टन क्रूड ऑईल आयात केले होते.

इराणकडून जाहीर करण्यात आलेल्या सवलतींचा फायदा भारतीय रिफायनरी कंपन्यांना होणार असून तेल बॅरेलमागे १ डॉलर सवलत दिली गेली तरी या कंपन्यांचा वाहतूक खर्च वाचणार आहे शिवाय इराण ऑईल प्रोसेसिंगला चांलनाही मिळू शकणार आहे. सध्याच्या आंतररराष्ट्रीय दरांपेक्षा कमी दराने तेल पुरविण्याची तयारी इराणने दाखविली आहे. सध्या फक्त इराणच ९० दिवसांच्या क्रेडीटवर तेल पुरवित आहे मात्र अन्य मध्यपूर्वेतील देश ३० दिवसांचे क्रेडीट देत आहेत. पाश्चिमात्य देशांनी इराणची तेलाबाबत नाकेबंदी केल्याने इराण हर मार्गाने आपले तेल विकू पाहात आहे असे सांगितले जात आहे.

इराणने तेल खरेदीत सवलती जाहीर केल्या असल्या तरी रूपयांत पूर्ण रक्कम घेण्यास मात्र नकार दिला आहे. भारताला पुरविल्या जाणार्‍या तेलातील ४५ टक्के तेलाची किंमत रूपयांत तर बाकीची रक्कम रूबल, येन किवा यान अशा चलनातच द्यावी लागणार आहे.