आसारामच्या मुलाचे विरार येथील आश्रम जमीनदोस्त

विरार- विरारच्या कुंभारपाडा येथील आसाराम बापूच्या मुलाचा सरकारी जागेवर उभारलेला आश्रम बेकायदा असल्याने जमीनदोस्त करण्यात आला. वसई-विरार महापालिका आणि तहसील कार्यालयाने ही कारवाई केली आतापर्यंत सरकारी जागेवर उभा असलेल्या या आश्रमाविरोधात तक्रारी येत असतानाही त्यावर कारवाई न करणा-या महापालिकेने आताच ही कारवाई केल्याने शंका उपस्थित झाली आहे.

आसाराम बापूचा अडसर दूर झाल्याने आता या जागेवर भूमाफियांची नजर वळली असल्याने त्यांच्या सोयीसाठी ही कारवाई केल्याचा सूर व्यक्त होत आहे. गेल्या अनेक वर्षापासून कुंभारपाडा विभागातील सव्‍‌र्हे नंबर ४०१ या सरकारी जागेवर हा आश्रम उभा होता. मात्र आजपर्यंत या आश्रमाविरोधात कुणीही आवाज उठवला नव्हता. या आश्रमाचे माजी कर्मचारी महेंद्र चव्हाण आणि इतर ग्रामस्थांनी याबाबत महसूल विभागाकडे तक्रारी केल्या होत्या. मात्र आसारामच्या वरदहस्तामुळे एकाही अधिका-याने या आश्रमावर कारवाई केली नाही.

या आश्रमात राहणा-या एका मुलीनेही बलात्कार झाल्याची तक्रार केली होती. मात्र या घटनेचीही दखल घेतली गेली नाही. आता आश्रमाशेजारील आदिवासींना धमकावून त्यांच्या जमिनी घेतल्याचेही समोर आले आहे. मात्र विरार पोलिस आणि महसूल अधिका-यांनी हे सर्व प्रकरण दडपल्याचा आरोप या नागरिकांनी केला आहे.

Leave a Comment