
उत्तर भारतातील उत्तर प्रदेशात असलेले आग्रा हे जगप्रसिद्ध शहर युनेस्को वर्ल्ड हेरिटेजच्या तीन साईटस असलेले भारतातील बहुदा एकमेव शहर आहे. दिल्लीपासून २०० किमीवर असलेले हे शहर ताजमहाल, आग्रा फोर्ट आणि जवळच असलेल्या फतेपूर शिक्री यासाठी जसे जगभरात प्रसिद्ध आहे तसेच येथे अन्य अनेक इमारती, मंदिरे, कबरी यांचीही खूप गर्दी आहे. भारत भेटीवर येणार्याज परदेशी पर्यटकांची भेट आग्रा पाहिल्याशिवाय सार्थकी लागू शकत नाही असे म्हणतात. जगातील सात आश्चर्यात गणना झालेला ताजमहाल हे येथले मुख्य आकर्षण.

मुघल साम्राज्याची राजधानी म्हणूनही कांही काळ आग्रा चर्चेत होते.१५२६ ते १६५८ या काळात मुघल सम्राटांची राजधानी आग्रा होती. मात्र आग्रा शहराचे उल्लेख महाभारतातही सापडतात. प्रत्यक्ष रेकॉर्ड मात्र ११ व्या शतकापासून उपलब्ध आहे. येथे ५०० वर्षांच्या काळात अनेक मुघल तसेच हिंदू राजांनी राज्य केले. १५०६ साली सुलतान सिकंदर लोधी याने दिल्लीहून राजधानी आग्रा येथे आणली. मुघल सम्राट हे बांधकाम सम्राटच होते त्यामुळे या शहरातअनेक सुंदर इमारती उभारल्या गेल्या. अकबराने बांधलेले आग्रा फोर्ट आणि फतेपूर शिक्री व शहाजहानने आपल्या पत्नीच्या स्मरणार्थ उभारलेला ताजमहाल म्हणजे पांढर्याश संगमरवरातील जणू गोठलेला अश्रू असे याचे वर्णन केले जाते.



