तमाम महिला वर्गासाठी संशोधकांनी एक आनंदाची खबर आणली आहे. स्वयंपाकात अगदी मस्ट असलेला कांदा चिरताना डोळ्यांची कशी आग होते आणि वारंवार डोळे कसे भरून येतात याचा अनुभव जगभरातील महिलांना असणार. त्याचा त्रासही महिलाच सोसत असतात. मात्र संशोधकांनी आता महिलांची या त्रासातून मुक्तता होऊ शकेल असे कांद्याचे वाण विकसित केले आहे. हा कांदा चिरताना डोळ्यातून पाणी येणार नाही, डोळे चुरचुरणार नाहीतच पण हृदयासंबंधी रोगांवर हा कांदा प्रभावशाली ठरेल तसेच वजन वाढू नये म्हणूनही तो उपयुक्त ठरेल.
कोलीन एडी आणि त्याच्या सहकार्यांनी हा नवा कांदा विकसित केला आहे. एडी यांच्या म्हणण्याप्रमाणे लसणात असते तसेच सल्फर संयुग या कांद्यात विकसित करण्यात आले आहे. त्यामुळे कांदा चिरताना डोळ्यातून पाणी येणार नाही तसेच लसणाचे जे फायदे आहेत ते सर्व या कांद्यातूनही मिळणार आहेत. अनेक लोक रक्तात गुठळ्या होऊ नयेत, हृदयविकार होऊ नये म्हणून नेमाने लसूण खातात. तसेच वजन नियंत्रणात राहण्यासाठीही लसूण वापरला जातो. हे सर्व फायदे या कांद्यामुळेही मिळणार आहेत.
या काद्यांच्या उंदरांवर केलेल्या चाचण्या अतिशय यशस्वी ठरल्या असून लसणापेक्षाही हा कांदा आरोग्यासाठी अधिक उपयुक्त असल्याचे दिसून आले आहे. सूज कमी करण्यासाठीही हा कांदा उपयोगी ठरला असल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे. हे संशोधन अमेरिकन केमिकल सोसायटी जर्नल ऑफ अ्रॅग्रीकल्चर अॅन्ड फूड केमिस्ट*ी मध्ये प्रसिद्ध करण्यात आले आहे.