जिनिव्हा – स्विस बँकातून कर चुकवेगिरीसाठी जगभरातून ठेवण्यात येत असलेल्या काळ्या पैशांवर आता निर्बंध आल्याने या बँकातून असा पैसा ठेवलेले ग्राहक नाना युक्त्या प्रयुक्त्यानी हा पैसा अन्यत्र हलवू लागले असल्याचे फ्रान्स, जर्मनी, इटली व स्पेनसहीत अनेक युरोपिय देशांच्या कस्टम अधिकार्यांनी सांगितले. बड्या देशांच्या दबावामुळे असा पैसा ठेवणार्यांची माहिती संबंधित देशांच्या सरकारांना देण्यासंबंधीचा करार स्विस सरकारला करावा लागला आहे. इतकेच नव्हे तर या करारानुसार बँकांकडे अशा स्वरूपात येणार्या पैशांवर अगोदरच कर कापून तो संबंधित देशाच्या सरकारकडेही त्यांना जमा करावा लागणार आहे. यामुळे आता स्वीस बँकांच्या गुप्ततेबद्दल असलेले आकर्षण संपुष्टात आले आहे.
पॅरिस स्टेशनवर अशा प्रकारे कॅरी बँगमधून साडेतीन लाख युरो नेणार्या एका इसमाला कस्टम अधिकार्यांनी संशयावरून अटक केली आहे. युरोपिय संघाच्या नियमानुसार पूर्व कल्पना दिल्याशिवाय १० हजार युरोपेक्षा अधिक रोकड बरोबर बाळगता येत नाही. कांही ठिकाणी लिफाफ्यात भरलेले पैसे कस्टम अधिकार्यांनी जप्त केले आहेत तर कांही ठिकाणी लगेज, केक बॉक्स, बटाटे वेफर्सच्या पिशव्या, लहान मुलांचे खिसे याचाही वापर काळा पैसावाले पैसे नेण्यासाठी करत असल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे यात उद्योजक, व्यावसायिक, राजकीय नेते, पर्यटक अशा सर्व स्तरांतील लोकांचा सहभाग आहे.
भारत आणि चीन तसेच अन्य आशियाई देशातील लोकांनी स्विस बँकेत दडविलेला पैसा काढून घेण्यास सुरवात केली असून हा पैसा युरोपिय देशात नेण्याचा प्रयत्न केला जात आहे असे समजते. त्यासाठीही अशाच अनेक युक्त्या वापरल्या जात असल्याचे कस्टम अधिकारी सांगतात. बहुतेक वेळा हा पैसा ५०० युरोच्या नोटांच्या गठ्यात असतो असेही समजते.