गुरूत्वाकर्षणामुळेही पडते टक्कल

केवळ वृद्धांनाच नाही तर आजकाल तरूण पिढीतील मुलांनाही डोक्याला पडणारे टक्कल ही मोठी समस्या वाटते आहे. खाण्यापिण्याच्या बदलत्या सवयी, हार्मोन्समधील बदल, घराण्याचा वारसा, प्रदूषण अशी अनेक कारणे टक्कल पडण्यामागे असतात हे जरी खरे असले तरी अंकारा येथील प्रसिद्ध प्लॅस्टीक सर्जन एमिन उस्तने यांनी केलेल्या संशोधनानुसार गुरूत्वाकर्षणाचाही टक्कल पडण्यास मोठा हातभार लागत असतो.

उस्तने यांच्या म्हणण्याप्रमाणे पुरूषांना जे टक्कल पडते त्यामागे गुरूत्वाकर्षणही कारणीभूत असते. मात्र या दृष्टीने कधी कोणी विचारच केलेला नव्हता. डोक्याच्या त्वचेखाली एक प्रकारचे आवरण असते ज्यामुळे केसाच्या मुळांवर दाब पडण्यापासून संरक्षण मिळत असते. या आवरणाला वसा असे म्हणता येईल. पुरूषांमध्ये टक्कल पडण्याचा पॅटर्नही बहुतेक वेळा समान असतो. म्हणजे वय वाढेल तसे आजूबाजूचे केस राहतात पण माथ्यावरचे केस जातात. यामागे गुरूत्वाकर्षण असते. वय वाढले की त्वचेखालील वसेचा थर पातळ होतो. त्यामुळे डोक्यावर पडणार्‍या गुरूत्वाकर्षणाचा दाब या थराखाली असणार्‍या केशग्रंथीवर पडतो व त्यामुळे ही मुळे मरतात.

या प्रक्रियेत टेस्टोस्टेरॉन हार्मोनमध्ये बदल होतात. त्यामुळे या हार्मोनला विरोध करणारी औषधे दिली तर केस गळणे थांबविता येते. महिलांमध्ये त्यांच्यातील इस्ट्रोजेन हे हार्मोन असे संरक्षण देत असतात. त्यामुळे त्यांना टक्कल पडत नाही. मात्र वय वाढत जाईल तशा केशग्रंथीचा आकार कमी होत जातो व त्यामुळे केस विरळ मात्र होतात असे उस्तने यांचे म्हणणे आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment