कांद्यापाठोपाठ बटाटा ही रडविणार

पुणे – कांद्यांनी सर्वसामान्य नागरिकांना रडविले असतानाच आता बटाटेही कांद्याच्याच मार्गाने जात असल्याचे दिसून येत असून गेल्या दोन आठवड्यात बटाट्याचे भावही १५ रूपयांवरून २५ रूपयांवर गेले आहेत. आगामी काळात बटाटेही काद्यांशी बरोबरी करतील असे बटाटा व्यापार्‍यांचे म्हणणे असून त्यामागे यंदा पावसामुळे बटाट्याचे मोठ्या प्रमाणावर झालेले नुकसान कारणीभूत आहे असे समजते.

स्वयंपाकघरात तसेच हॉटेल्समधून व खाद्य पदार्थ विकणार्‍यां टपर्‍यांतूनही कांदा, बटाटा आणि टोमॅटोचा वापर सर्वाधिक केला जातेा. कांदा टोमेटोचे भाव सर्वसामान्यांच्या कधीच आवाक्याबाहेर केले आहेत आणि आता बटाटाही त्याच मार्गाने वाटचाल करू लागला आहे. दीर्घकाळ जोरदार पडलेल्या पावसामुळे बटाट्याचे बहुतांश पीक वाया गेले आहे असे कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यापार्‍यांकडून सांगण्यात आले आहे.

वास्तविक नोव्हेंबरच्या सुरवातीपासूनच पुण्याच्या जुन्नर आणि तळेगांव या बटाटा उत्पादक भागातून बटाटे आवक सुरू होते मात्र यंदाही ती २५ नोव्हेंबर नंतर सुरू होईल असा अंदाज आहे. या भागात झालेला मुसळधार आणि सततचा पाऊस यामुळे बहुतेक पीक हातचे गेले आहे. जुना बटाटा संपण्याच्या मार्गावर आहे आणि नवीन माल बाजारात नाही. परिणामी मागणी पुरवठा यांत तफावत पडत असून त्यामुळे भाव चढू लागले आहेत.

वाशी येथील बाजारातील व्यापारी म्हणाले की ऑगस्ट व सप्टेंबर या लावणी हंगामात आकाश सतत ढगाळ होते आणि पाऊस दीर्घकाळ पडल्याने पुरेशी उघडीप मिळाली नाही. परिणामी बटाट्याचे मोठे नुकसान झाले आहे. कांद्यासारखेच बटाटेही महागले तर नवल वाटायला नको. बटाट्याचे दर सध्या २५ रूपयांवर आहेत ते आगामी काळात ५० रूपयांवर जातील असा अंदाज व्यक्त केला गेला आहे. याची मोठी झळ सर्वसामान्यांप्रमाणेच हॉटेल व्यावसायिकांनाही बसणार आहे.

Leave a Comment