अमेरिकन दिग्गज कंपनी हर्ले डेव्हीडसनने ऑगस्टमधील रश मोअर प्रकल्पांतर्गत दोन नवीन मोटरसायकल बाजारात आणण्याचे ठरविले असून स्ट्रीट ७५० व स्ट्रीट ५०० या दोन्ही गाड्या पूर्णपणे भारतात उत्पादित केल्या जाणार आहेत. गाड्यांच्या किमतीसंबंधी अजून कोणतीही घोषणा केली गेलेली नाही मात्र नागरी युवकांना समोर ठेवून या गाड्यांचे डिझाईन केले गेले आहे असे कंपनीचे अध्यक्ष व चीफ ऑपरेटिंग ऑफिसर मॅट लेवातिच यांनी सांगितले.
मॅट म्हणाले की १४ वर्षानंतर कंपनीने प्रथमच नवीन प्लॅटफॉर्मवर मोटरसायकल उत्पादन केले असून या गाड्या ग्रामीण तसेच नागरी भागासाठी अतिशय उत्तम आहेत. या गाडीचा आवाज आणि लूक तिची ओळख पटवायला पुरेसे ठरतील. गेली पाच वर्षे कंपनी अमेरिकेत नंबर वन सेलिंग ब्रँड म्हणून नाव राखून आहे. नवीन गाड्या प्रौढ युवकांसाठी अतिशय अनुरूप आहेत. तसेच भारतातील हरियाना प्रांतात तयार होणार्या या गाड्या युरोप व दक्षिण पूर्व आशियात निर्यातही केल्या जाणार आहेत. २०१४ साली कांही सिलेक्टीव्ह मार्केटमध्ये या गाड्या दाखल होतील.