तृणमूलचा कॉंग्रेसला धक्का

कोलकत्ता – तृणमूल कॉंग्रेसने पश्‍चिम बंगालच्या नाडिया जिल्ह्यातील कूपर कॅम्प नगरपालिका कॉंग्रेसच्या हातून हिसकावून घेतली आहे. या नगरपालिकेत एकूण १२ सदस्य असून त्यातले ११ सदस्य कॉंग्रेसचे होते. कॉंग्रेसने या नगरपालिकेत घवघवीत यश मिळविले होते. परंतु हे अकराही सदस्य कॉंग्रेसचा त्याग करून तृणमूल कॉंग्रेसमध्ये सहभागी झाले असल्यामुळे ही नगरपालिका आता तृणमूल कॉंग्रेसच्या ताब्यात आली आहे. आता या नगरपालिकेत कॉंग्रेसचा एकही सदस्य राहिलेला नाही.

अशा प्रकारचा कॉंग्रेसला बसलेला हा तिसरा धक्का आहे. यापूर्वी बिरभूम जिल्ह्यातील सैंथिया आणि नाडिया जिल्ह्यातली क्रिश नगर या दोन नगरपालिका तृणमूल कॉंग्रेसने पक्षांतराच्या माध्यमातून कॉंग्रेसकडून हिसकावून घेतली आहे. यातली सैंथिया नगरपालिका तर गेल्या १५ वर्षांपासून कॉंग्रेसच्या ताब्यात होती, पण आता तिथल्या नगराध्यक्षांनी नऊ नगरसेवकांसह तृणमूल कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

केवळ कॉंग्रेसच नव्हे तर डाव्या आघाडीतील माकपा आणि आरएसपी या पक्षाचे नगरसेवक सुद्धा तृणमूल कॉंग्रेसमध्ये येत आहेत, असे तृणमूल कॉंग्रेसचे सरचिटणीस मुकूल राय यांनी सांगितले. पश्‍चिम बंगालच्या दक्षिण भागातील कॉंग्रेसच्या हातात असलेल्या नगरपालिका तृणमूलच्या हातात गेलेल्या आहेत. आता केवळ नाडिया जिल्ह्यातील शांतीपूर ही नगरपालिका कॉंग्रेसच्या हातात आहे. तीही लवकरच तृणमूलच्या ताब्यात येईल. बिरनगर येथील नगरपालिका सुद्धा लवकरच कॉंग्रेसच्या हातून जाईल, असेही मुकूल राय म्हणाले.

Leave a Comment