सर्वेक्षणांवर बंदी घालण्याची बसपाचीही मागणी

नवी दिल्ली – मतदानपूर्व मतदार सर्वेक्षणांवर बंदी घालण्याच्या कॉंग्रेसच्या मागणीवरून वाद सुरू असतानाच बहुजन समाज पार्टी आणि जनता दल (यु) या दोन पक्षांनीही कॉंग्रेसच्या सुरात सूर मिसळून अशी सर्वेक्षणे बंद करावीत, अशी मागणी केली आहे. बहुजन समाज पार्टीच्या नेत्या मायावती यांनी ही सर्वेक्षणे वस्तुनिष्ठ नसल्यामुळे आणि त्यातून जनतेचे खरे मत व्यक्त होत नसल्यामुळे त्यांच्यावर बंदी घातली जावी, असे म्हटले आहे.

बसपाचे सरचिटणीस सतीशचंद्र मिश्रा यांनी या संबंधात मुख्य निवडणूक आयुक्तांना पत्र लिहिले आहे. मतदान सर्वेक्षणे करणार्‍या संस्थांना पैसे देऊन काही राजकीय पक्ष आपल्याला अनुकूल असे निष्कर्ष काढायला लावतात, असे मिश्रा यांनी म्हटले आहे. जनता दल (यु) चे नेते बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनीही अशीच मागणी केली आहे.

या मागणीवर प्रतिक्रिया व्यक्त करताना भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते शहनवाज हुसेन यांनी, लोकांना आपली मते व्यक्त करण्याचा सुद्धा अधिकार नाही का, असा सवाल केला आहे. या सर्वेक्षणातले निष्कर्ष बरोबर ठरोत की चुकीचे असोत पण चुकीचे आहेत म्हणून त्यांना तसे निष्कर्ष सांगण्याचा अधिकारच नसावा हे म्हणणे बरोबर नाही, असे शहनवाज हुसेन यांनी म्हटले आहे.

Leave a Comment