राहुल गांधींनी मागितली आठवड्याची मुदत

नवी दिल्ली – निवडणूक आचार संहितेच्या भंगाच्या संदर्भात आयोगाने दिलेल्या नोटिसीला उत्तर देण्यास राहुल गांधी यांनी एका आठवड्याची मुदत मागितली आहे. राजस्थान आणि मध्य प्रदेशाच्या निवडणूक प्रचार दौर्‍यात राहुल गांधी यांनी केलेल्या काही विधानांनी आचारसंहितेचा भंग झाला असल्याची तक्रार भाजपाच्या नेत्यांनी केली होती आणि त्यावरून आयोगाने राहुल गांधी यांना नोटीस पाठवली होती.

आज राहुल गांधी निर्वाचन आयोगाच्या कार्यालयात गेले होते आणि ते आयोगाला काय उत्तर देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. पण त्यांनी आयोगाच्या नोटिसीला काही उत्तर देण्याच्या ऐवजी त्यासाठी आठवड्याची मुदत मागणारा अर्ज सादर केला. निवडणूक आयोगाने राहुल गांधी यांच्या ज्या भाषणांवरून त्यांना ही नोटीस दिली होती. त्या भाषणाच्या ध्वनिङ्गिती आधी ऐकल्या होत्या आणि त्यांना आचारसंहितेचा भंग केल्याबद्दल कारवाई का करू नये अशी विचारणा करणारी नोटीस पाठवली होती.

राजस्थान आणि मध्यप्रदेशाच्या निवडणूक अधिकार्‍यांनीही आयोगाला आपले अहवाल पाठवले होते आणि त्यात राहुल गांधी यांच्या विरोधात टिप्पणी केली होती. राहुल गांधी यांची ही भाषणे निवडणूक आचार संहितेच्या काही कलमांचा भंग करणारी असल्याचे आयोगाने पाठवलेल्या नोटिसीत म्हटले होते.

Leave a Comment