कॉंग्रेस सभांवरही बंदीची मागणी करणार का ?

नवी दिल्ली – मतदारांची मते जाणून घेणारी सर्वेक्षणे आपल्याला अनुकूल नाहीत असे दिसायला लागताच त्यांच्यावर बंदी घालण्याची मागणी करणारे कॉंग्रेसचे नेते आता जाहीर सभांवरही बंदी घालण्याची मागणी करणार आहेत का असा बोचरा सवाल शिरोमणी अकाली दलाने विचारला आहे. सर्वेक्षणे तर सत्य सांगत असतात. ती केवळ समाजातल्या वातावरणाचा अंदाज देत असतात. त्यांच्यावर बंदी घालण्याने काही वातावरण बदलत नसते असे मत भाजपाचे प्रवक्ते मुख्तार अब्बास नक्वी यांनी व्यक्त केले आहे. ‘दूताला मारल्याने संदेश नष्ट होत नसतो,’ असे ते म्हणाले.

समाजात आज कॉंग्रेसचे गैरशासन आणि भ्रष्टाचार यांच्याबाबत असंंतोष पसरला आहे. मतदारांच्या पाहण्यांतून तो स्पष्ट दिसत आहे. सर्वेक्षणांचे निष्कर्ष जाहीर करण्यास बंदी घातल्याने हा असंतोष काही झाकला जाणार नाही असे नक्वी यांनी म्हटले आहे. अशी सर्वेक्षणे कॉंग्रेसला अनुकूल होत होती तेव्हा हेच कॉंग्रेस नेते सर्वेक्षणांच्या बाजूने बोलत होते असे नक्वी यांनी निदर्शनास आणून दिले.

त्या काळात निष्कर्ष भाजपाच्या विरोधात होते आणि अकाली दलाने त्यांच्यावर बंदी घालण्याची मागणी केली होती पण त्यावेळी कॉंग्रेसने अशी बंदी घालण्याला विरोध केला होता. कॉंग्रेसचा हा दुटप्पीपणा आहे असे नक्वी म्हणाले. ही सर्वेक्षणे शास्त्रीय नसतात आणि त्यांना जनमताचा काही आधार नसतो अशी हरकत आता कॉंग्रेसने घेतली आहे आणि त्यांच्यावर बंदी घालण्याची मागणी करणारे पत्र निवडणूक आयोगाला दिले आहे.

Leave a Comment