उच्च रक्तदाबाच्या प्रमाणात वाढ

भारतामध्ये मनोकायिक विकारांच्या प्रमाणात मोठी वाढ होत आहे. जागतिक आरोग्य संघटना आणि आर्मर्ड ङ्गोर्सेेस मेडिकल कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आलेल्या पाहणीचे निष्कर्ष जाहीर करण्यात आले असून त्यात हे म्हटले आहे. या निष्कर्षांमध्ये भारतात उच्च रक्तदाबाचे रुग्ण वाढत चालले असल्याचा इशारा देण्यात आला आहे. मधुमेहाच्या संबंधात अशीच पाहणी करण्यात आली असता मधुमेहाचे प्रमाण शहरी भागात अधिक असल्याचे आढळले होते. परंतु उच्च रक्तदाबाचे प्रमाण मात्र शहरांबरोबरच खेड्यांमध्येही वाढत चालले असल्याचे आढळले आहे. शहरामध्ये २० ते ४० टक्के लोकांना रक्तदाबाने त्रस्त केलेले आहे. पण ग्रामीण भागातही हे प्रमाण कमी नाही. तिथे ते १७ टक्क्यांपर्यंत आहे.

यापेक्षा अधिक धक्कादायक माहिती अशी की, ६० ते ७० टक्के लोकसंख्येला पुढे कधी तरी हा विकार जडेल अशी लक्षणे आढळत आहेत. हा विकार होण्यामागची कारणे काय असावीत, यावर आता बराच खल होत आहे. परंतु शास्त्रज्ञांच्या मते भारतामध्ये होत असलेला जीवन पद्धतीतला बदल या विकारास कारणीभूत ठरत आहे. विशेषत: ग्रामीण भागातले लोक शहरी भागात रहायला येत आहेत आणि या स्थलांतरामुळे जीवनपद्धती बदलत आहे. त्यामुळे मनावर होणारा परिणाम उच्च रक्तदाबात प्रतिबिंबित होत आहे.

या संबंधातली सर्वात चिंताजनक बाब अशी की, पुणे जिल्ह्यामध्ये केलेल्या पाहणीत उच्च रक्तदाब होण्याचे वय २६ ते ३६ वर्षे असल्याचे आढळले आहे. ज्या कुटुंबातील पती आणि पत्नी दोघेही नोकरी करतात त्या कुटुंबामध्ये हा प्रकार जास्त आढळला. अशा लोकांना रक्तदाबापासून सुटका मिळविण्यासाठी काय करता येईल यावर डॉक्टर लोकांनी विचार सुरू केला आहेच. परंतु औषधांपेक्षा जीवन पद्धतीतला बदल यासाठी उपयुक्त ठरेल अशी खात्री त्यांना वाटत आहे. अशा कुटुंबातील लोकांनी घराच्या बाहेर जेवण करणे टाळावे. आठवड्यातले किमान सहा दिवस घरी स्वयंपाक करून जेवण करावे आणि दररोज किमान ४५ मिनिटे चालण्याचा व्यायाम करावा. असे केल्याने या विकारातून सुटका मिळू शकेल, असा विश्‍वास तज्ज्ञांना वाटत आहे. कामशेत येथील एका पाहणीत रक्तदाबाच्या या नव्या रुग्णांमध्ये स्त्रियांची संख्या अधिक असल्याचे दिसून आले आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment