नवी दिल्ली – आगामी काळात चार राज्यातील विधानसभा निवडणूका होत आहेत. या निवडणुकीदरम्यान जाहीर होणा-या जनमत चाचण्या सदोष, विश्वासार्हतेचा अभाव असलेल्या व छुपे हितसंबंध जपण्यासाठी जाणीवपूर्वक फेरफार करून तयार केलेल्या असतात, असे सांगून या जनमत चाचण्यांवरील निर्बंधाबाबत निवडणूक आयोगाच्या मताशी काँग्रेसने सहमती व्यक्त केली आहे.
निवडणूक आयोगाने जनमत चाचण्यांबाबत देशातील विविध पक्षांकडे विचारणा केली होती. त्यापूर्वी निवडणूक आयोगाने जनमत चाचण्यांवर बंदी घालण्यासाठी सरकारकडे एक प्रस्ताव सादर केला होता. मात्र, याबाबत आयोगाने विविध पक्षांशी नव्याने विचारविनिमय करावा, असे सांगत हा प्रस्ताव फेटाळण्यात आला होता.
काँग्रेसने जनमत चाचण्यांसंदर्भात निवडणूक आयोगाला ३० ऑक्टोबर रोजी पाठवलेल्या पत्रात आपला दृष्टिकोन मांडला आहे. निवडणुकीच्या काळात अशा प्रकारच्या जनमत चाचण्या प्रसिद्ध करण्यावर निर्बंध असावेत, या निवडणूक आयोगाच्या मताशी काँग्रेसने सहमती व्यक्त केली आहे.या जनमत चाचण्या एक तर वैज्ञानिक नसतात, त्याच प्रकारे त्या घेण्याच्या प्रक्रियेमध्ये कोणत्याही प्रकारची पारदर्शकता नसते, असे अधिकृत मत अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या चिटणीस के. सी. मित्तल यांनी व्यक्त केले आहे.