चिकनवरून भांडण : लग्न मोडले

गिरीदिह (बिहार) – बिहारच्या गिरीदिह जिल्ह्यातील सिरोदी गावामध्ये एका विवाह समारंभात वर पक्षाच्या मंडळींनी चिकनसाठी हट्ट धरला, पण तो वधू पक्षाला पुरवता आला नाही. त्यामुळे दोन पक्षात एवढे भांडण झाले की, शेवटी हे लग्न मोडले. या भांडणात काही लोकांना रुग्णालयात सुद्धा दाखल करावे लागले. या घटनेत वधू पक्षाच्या लोकांनी वर पक्षाला भरपूर चोप दिला आणि बारात परत घेऊन जाणे भाग पाडले.

सिरोदी येथील महमद सिराजोद्दीन यांच्या हिना या कन्येचा निकाह पाचंबा गावातील निजामोद्दीन यांचा मुलगा महमद सज्जाद याच्याबरोबर होणार होता. वर पक्षाची मंडळी विवाह समारंभासाठी वधूच्या घरी पोचली आणि त्यांचे स्वागत झाले. निकाह दुसर्‍या दिवशी होणार होता. मात्र त्याच्या पूर्वीच रात्री वधू पक्षाने वर पक्षाला मेजवानी दिली. वर पक्षातील एका जावयाचे यावेळी कोंबडीच्या एका खास पदार्थाची मागणी केली. ती मागणी ऐनवेळी पूर्ण करणे वधू पक्षाला शक्य नव्हते. पण जावई मात्र हटून बसला होता.

या गोष्टीवरून वादावाद सुरू झाली आणि रात्री ११ नंतर चक्क मारामारी सुरू झाली. वर पक्षाकडची मंडळी अशी असभ्य आणि असंस्कृत असल्यामुळे वधू पक्षाचे लोक चिडले आणि त्यांनी त्यांना शिवीगाळ करून मारहाण केली. दुसर्‍या दिवशी सकाळी वर पक्षाचे मंडळी तरी सुद्धा वधूच्या घरी गेली, परंतु वधूच्या भावाने त्यांना हाकलून दिले आणि हा निकाह होणार नाही असे जाहीर केले.

Leave a Comment