कापसाचे उत्पादन वाढण्याची शक्यता

नवी दिल्ली – ऑक्टोबर २०१३ ते सप्टेंबर २०१४ या कापूस वर्षात देशातले कापसाचे उत्पादन ३ कोटी ७५ लाख गासड्या एवढे होण्याची शक्यता आहे. हे उत्पादन गतवर्षीच्या उत्पादनापेक्षा दहा लाख गासड्यांनी जास्त आहे. कापूस सल्लागार मंडळाच्या चालू वर्षातल्या पहिल्या बैठकीत हे आकडे समोर आले आहेत. आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरात या चार राज्यांमध्ये अतिवृष्टीमुळे दहा लाख गासड्या एवढ्या कापसाच्या पिकाचे नुकसान झाल्याचे अहवाल हाती आले आहेत. तरीही उत्पादनाचा आलेख चढताच राहील, असे दिसून आले आहे.

गतवर्षीच्या उत्पादनापैकी ३५ लाख गासड्या कापूस आता हातात शिल्लक आहे. त्याशिवाय १७ लाख गासड्या कापूस आयात केला जाणार आहे. आगामी वर्षात उत्पादन होणार्‍या ३ कोटी ७५ लाख गासड्या आणि हे ५२ लाख गासड्या एवढा साठा मिळून पुढच्या वर्षी देशात ४ कोटी २७ लाख गासड्या कापूस उपलब्ध राहणार आहे.

देशांतर्गत कापड गिरण्यांना २ कोटी ८२ लाख गासड्या कापूस लागतो. तो वगळता बराच कापूस शिल्लक राहतो. म्हणून कापसाची निर्यात केली जाते. चालू कापूस वर्षात ही निर्यात ९० लाख गासड्या एवढी होईल. २०१२-१३ या वर्षात देशातून १ कोटी २ लाख गासड्या कापूस निर्यात झाला होता. ती निर्यात विक्रमी होती. आगामी वर्षात त्या विक्रमाच्या जवळपास जाईल एवढा कापूस निर्यात होण्याची शक्यता आहे.

Leave a Comment