अर्थव्यवस्थेत तेजीची आशा

भारताने औद्योगिकीकरणाचे कितीही नारे लावले तरी अजूनही भारताच्या अर्थव्यवस्थेत शेतीचे महत्व कमी झालेले नाही. एकूण अर्थव्यवहारातला शेतीचा वाटा ८० टक्क्यांवरून २५ टक्क्यांवर खाली आला असला तरी त्यावर अवलंबून असणार्‍यांची संख्या ६० टक्के कायम राहिलेली आहे. म्हणून अजूनही देशाची अर्थव्यवस्था कशी राहणार हे शेतीवर अवलंबून आहे. शिवाय गेल्या काही वर्षामध्ये ग्रामीण भागात दोन बदल जाणवले आहेत. या भागात कृषेतर उद्योग मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत आणि अगदी अकुशल मजुरांचे उत्पन्न सुद्धा दिवसाला ३०० ते ४०० रुपयांपर्यंत गेले आहे. हे वाढते उत्पन्न आणि यावर्षी पडलेला उत्तम पाऊस यामुळे भारताच्या अर्थकारणात काही सकारात्मक संकेत मिळायला लागले आहेत. भारतामध्ये पाऊस बेभरवशाचा असतो. त्यामुळे देशातले शेतकरी आभाळाकडे डोळे लावून बसलेले असतात. परंतु देशाचे अर्थमंत्री सुद्धा तेवढ्याच उत्सुकतेने ढगाकडे बघत असतात. कारण त्यांच्या अर्थव्यवस्थेचे व्यवस्थापन त्या ढगातून पडणार्‍या पाण्यावर अवलंबून असते. आपले अर्थमंत्री पी. चिदंबरम् यावर्षी तरी मोठे आशावादी आहेत. कारण ग्रामीण भागामध्ये अर्थव्यवहाराला चांगली गती मिळालेली दिसत आहे. विविध व्यापारी संस्थांनी दिलेल्या अहवालावरून एक चांगला संकेत मिळत आहे, तो म्हणजे ग्रामीण भागातल्या संपन्न वर्गाचा सोन्याकडचा ओढा कमी होत चालला आहे.

धनत्रयोदशी दिवशी सोन्याच्या बाजारात ही गोष्ट लक्षात आली आहे. उत्तम पाऊस, पीकपाणी आणि ग्रामीण भागातली वाढती क्रयशक्ती यामुळे या धनत्रयोदशीला सोन्याला प्रचंड मागणी येईल, असा अंदाज व्यक्त केला जात होता. एवढेच नव्हे तर अमेरिकेत सध्या सोने महाग झाले असल्यामुळे आणि त्यातच भारत सरकारने सोन्यावर मोठा आयातकर लावला असल्यामुळे सोन्याच्या किंमती विक्रमी पातळीपर्यंत पोचतील असे वाटले होते. मात्र सोन्याची किंमत वाढण्यास अशा सगळ्या गोष्टी अनुकूल असतानाही सोन्याचा भाव धनत्रयोदशीला म्हणावा तसा वाढला नाही. कारण ग्रामीण भागातला ग्राहक आता सोन्यापेक्षा वातानुकूलीत यंत्रे, टीव्ही, संगणक, वॉशिंग मशीन अशा ग्राहकोपयोगी वस्तूंकडे वळायला लागला आहे. भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये अशी मागणी वाढून, उत्पादन वाढून रोजगार निर्मिती झाली तर अर्थव्यवस्थेला चांगली गती येणार आहे. त्यादृष्टीने हा बदल मोठा शुभसूचक आहे. म्हणूनच अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी आगामी वर्षातल्या अर्थव्यवस्थेच्या चित्राबाबत मोठा आशावाद प्रकट केला आहे.

त्यांनी दिवाळीच्या पाडव्याच्या निमित्ताने भारताच्या अर्थव्यवस्थेचे आगामी वर्षातले चित्र स्पष्ट करणारी पत्रकार परिषद घेतली. तिच्यात बोलताना चिदंबरम यांनी पुढचे वर्ष भारताच्या अर्थव्यवस्थेत नव्या गोष्टी घडवणारे ठरेल असे आकडेवारीनिशी दाखवून दिले. गेल्या वर्षभरात भारताला व्यापारी तूट आणि घसरणारा रुपया या दोन प्रश्‍नांनी ङ्गार ग्रासले होते. मात्र गेल्या महिनाभरात हे प्रश्‍न सोडवण्याकडे आपली सकारात्मक वाटचाल होत असल्याचे दिसून आले. पहिली गोष्ट म्हणजे रुपया सावरला. एका डॉलरला ६५ रुपये इथंपर्यंत गडगडलेला रुपया वर्षाच्या अखेरपर्यंत ७५ रुपयांपर्यंत खाली जाईल अशी भीती अनेकजण व्यक्त करत होते. मात्र ही भीती अनाठायी ठरली आहे आणि रुपयाचे गडगडणे थांबले आहे. तो म्हणावा तेवढा सावरून महाग झाला नाही ही गोष्ट खरी. परंतु ६५ रुपयांपासून पुढे घसरला नाही ही गोष्ट मान्य करावीच लागेल. आपली अर्थव्यवस्था सुधारत असल्याचे ते लक्षण आहे. रुपयाची वेगवान घसरण सुरू असण्याच्या काळात सोन्याबद्दल बरीच चर्चा झाली होती. सोन्याची आयात जितकी कमी होईल तेवढा रुपया सावरेल असे म्हटले जात होते. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत झालेली ३०० टनांपर्यंतची सोन्याची आयात दुसर्‍या तिमाहीत ६० टनापर्यंत खाली आली. परिणामी आपले परकीय चलन बरेच वाचले आणि दुसर्‍या बाजूने निर्यात वाढली. त्यामुळे आयात निर्यात व्यापारातला तोटा कमी झाला.

गेल्या आर्थिक वर्षात हा तोटा ८० अब्ज डॉलर्स एवढा होता तो चालू आर्थिक वर्षात ६० अब्ज डॉलर्सपर्यंत खाली येईल असे दिसायला लागले. परिणामी रुपया सावरला आणि गुंतवणूकदारात उत्साह निर्माण झाला. गेल्या दोन दिवसात शेअर बाजाराने एवढी उसळी घेतली की या उसळीने ऐतिहासिक विक्रम प्रस्थापित केला. अर्थमंत्र्यांनी दोन दिवसांपूर्वी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत देशातल्या व्यापार्‍यांना पैसा हातात न ठेवता उत्पादक कामात गुंतवावा असे आवाहन केले. अर्थमंत्र्यांनी अर्थव्यवस्थेचे आणि तिच्या प्रगतीचे इंगीतच सांगितले आहे. कारण पैसा जेवढा उत्पादक कामात गुंतेल तेवढी अर्थव्यवस्थेची प्रगती होत असते. आपल्या देशातला ङ्गार मोठा दोष म्हणजे आपल्या देशातले लोक आपल्या जवळचा पैसा अधिक प्रमाणात सोन्यात गुंतवतात. ही खोड जेव्हा जाईल तेव्हा आपली अर्थव्यवस्था घोडदौड करायला लागेल. मात्र त्याबाबत जागृती व्हायला हवी.

Leave a Comment