लॉस एंजेलिस विमानतळावर गोळीबार – १ ठार

लॉस एंजेलिस – अमेरिकेच्या व्यस्त विमानतळात गणना होणार्‍या लॉस एंजेलिस आंतरराष्ट्रीय विमानतळावर एक व्यक्तीने केलेल्या बेछूट गोळीबारात वाहतूक सुरक्षा प्रशासनाचा रक्षक ठार झाला तर अनेक प्रवासी जखमी झाल्याचे वृत्त आहे. जखमींवर रूग्णालयात उपचार सुरू असून या विमानतळावरून होणारी उड्डाणे थांबविली गेली असल्याचे समजते. गोळीबार होताच टर्मिनल दोन आणि तीन त्वरीत रिकामी करण्यात आली.

या संबंधी मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवारी या विमानतळावर शिरलेल्या एका व्यक्तीने त्याच्याजवळील शक्तीमान रायफलमधून गोळीबार करण्यास सुरवात केली. त्यात सुरक्षा रक्षक ठार झाला तर गोळ्यांच्या वर्षावात अनेक प्रवासी जखमी झाले. गोळीबाराचे आवाज आणि विमान प्रशासनाकडून त्याची केली गेलेली घोषणा यामुळे प्रवाशात एकच गोंधळ उडाला. विमानतळ पोलिस कक्षाने त्वरेने दोन टर्मिनल रिकामी केली.विमानतळ पोलिस सुपरिटेंडेंट पॅट्रिक गॅनॉन यांनी बंदूकधारी एकटाच होता असे सांगितले. विमानतळाची सुरक्षा वाढविली गेली आहे.

गोळीबारात जखमी झालेल्यांची संख्या मोठी असली तरी नककी आकडा समजलेला नाही. मात्र एका वृत्तानुसार हल्लेखोर पोलिसांनी केलेल्या उलट गोळीबारात ठार झाला तर अन्य एका वृत्तानुसार पोलिसांनी हल्लेखोराला पकडून पोलिस ठाण्यात पुढील चौकशीसाठी नेले आहे. हल्लेखोराने लष्करी जवानासारखा पोषाख केलेला होता. या हल्ल्याची अध्यक्ष ओबामा यांना कल्पना दिली गेली आहे.

Leave a Comment