लक्ष्याचा पाठलाग करताना विराटने ठोकली ११ शतके

नवी दिल्ली – लक्ष्याचा पाठलाग करताना आतापर्यंत विराट कोहलीने ११ शतके ठोकली आहेत. कोहलीने लक्ष्याचा पाठलाग करताना जी ११ शतके ठोकली आहेत त्या सर्व एकदिवसीय सामन्यांत टीम इंडियाने बाजी मारली आहे. याबाबतीत कोहली-गेल एकाच प्लॅटफॉर्मवर आहेत. विराटच्या पुढे फक्त ‘मास्टर ब्लास्टर’ सचिन तेंडुलकरच आहे. त्याने लक्ष्याचा पाठलाग करताना १७ शतके ठोकली आहेत. यातही सचिनच विराटपुढे आहे. त्याने लक्ष्याचा पाठलाग करताना १४ एकदिवसीय सामन्यांत टीम इंडियाला विजय मिळवून दिला आहे. विराटने जी पाच शतके लगावली आहेत त्यात त्याने प्रतिस्पर्धी संघाच्या ३०० पेक्षा जास्त धावांचा पाठलाग चक्क पाचवेळा केला आहे.

गेल्या काही दिवसांपासून टीम इंडियामध्येा आता विराट कोहलीचे स्थान तर पक्के झालेच आहे. हे कमी म्हणून की काय, विराट आता विक्रमांच्या बुकाची पानेही भरू लागला आहे. पाच वर्षांच्या एकदिवसीय कारकीर्दीत असे विक्रम विराटच्या बॅटमधून निघाले आहेत की, ज्यापासून संघातील दिग्गज खेळाडू कोसो दूर आहेत. सध्या सुरू असलेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतील जयपूर येथील लढतीत विराटने ५२ चेंडूंत १०० धावांची घणाघाती खेळी साकारून ऑस्ट्रेलियाचे ३६० धावांचे लक्ष्य आपल्या संघाला गाठून दिले होते. हे कमी म्हणून की काय बुधवारी नागपूरच्या ‘जामठा’वर ६६ चेंडूंत ११५ धावांची नाबाद खेळी साकारली. हे विराटचे ११२ एकदिवसीय डावांतील १७ वे शतक आहे.

कोहलीने टीम इंडियासाठी इतर कोणत्याही खेळाडूपेक्षा कमी सामन्यांत १७ शतके ठोकली आहेत. यापूर्वी हा विक्रम डावखुरा शैलीदार फलंदाज सौरभ गांगुलीच्या नावावर होता. त्याने १७० डावांत १७ शतके तर गांगुलीपूर्वी सईद अन्वर याने १७७ डावांत १७ शतके लगावली होती. गांगुली (१९९७ ते २०००), तेंडुलकर (१९९६-९८) आणि धोनी (२००७ ते ०९) या दिग्गजांनंतर विराटने २०११ ते १३ या सलग तीन वर्षांत १००० वर धावा करण्याचा विक्रम रचला आहे. ६० चेंडूंत एकदिवसीय सामन्यांत शतक झळकविण्याचा विक्रम टीम इंडियाच्याव सेहवागच्या नावावर होता तो विराटने जयपूर एकदिवसीय सामन्यात (५२ चेंडूंत १०० धावा) मोडला. कोहलीने आपल्या कारकीर्दीत सलग पाच डावांत ५० पेक्षा जास्त धावा करण्याची कामगिरी दोनवेळा केली आहे. या मालिकेत त्याने ६८ नाबाद, ६१, १०० नाबाद, ६८ आणि ११५ नाबाद अशा धावा केल्या आहेत.

Leave a Comment