मोदीशी कधीही, कोठेही, कोणत्याही विषयावर चर्चा करणार – सिब्बल

नवी दिल्ली – काँग्रेस नेते आणि केंद्रीय माहिती -तंत्रज्ञान मंत्री कपिल सिब्बल यांनी गुजरातचे मुख्यमंत्री आणि भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांना खुल्या चर्चेचे आव्हान दिले आहे. नरेंद्र मोदी हे जिथे जाईल तिथे फक्त खोटेपणा पसरवत आहेत, ते सांगत असलेल्या एकाही माहितीत तथ्य नसते, यासाठी आपण त्यांच्याबरोबर कुठेही जाहीर वादविवाद करण्यासाठी तयार आहोत, असंही कपिल सिब्बल यांनी म्हटले आहे.

मोदी यांच्याबरोबरच्या जाहीर चर्चेसाठी आपण केव्हाही तयार आहोत, एवढेच नाही तर या चर्चेची जागा, विषय, भाषा आणि दिवसही मोदी यांनीच निश्चित करावा असे आव्हानही कपिल सिब्बल यांनी दिले आहे. मोदी आपल्या भाषणातून देशवासियांना सांगत असलेली माहिती ही फक्त ऐकीव असते, ते मुद्दाम खोटारडेपणा पसरवत आहेत. आपल्या भाषणात ते जे काही बोलतात, ते त्यांनी आधी तपासून घेतले पाहिजे. ते आपल्या भाषणातून ज्या गोष्टी देशभर सांगत आहेत, त्यासाठी आपण त्यांच्याबरोबर कोणत्याही व्यासपीठावर चर्चा करण्यासाठी तयार आहोत, असं आव्हान कपिल सिब्बल यांनी दिले आहे.

मोदी अशा खुल्या चर्चेला कधीही तयार होणार नाहीत, ते फक्त जाहीर सभेतील भाषणांवर भर देत आहेत, तिथे श्रोत्यांना त्यांना प्रश्न विचारण्याची अनुमती नसते. ते कधीही पत्रकार परिषद घेत नाहीत. त्यामुळेच मी त्यांना जाहीर चर्चेचं आव्हान देत आहे, असेही सिब्बल म्हणाले. नरेंद्र मोदीचं सामान्य ज्ञान अतिशय कच्चं आहे, तसंच त्यांना राजकीय इतिहासाचीही काही माहिती नाही, असा आरोप कपिल सिब्बल यांनी केला.

ज्या माणसाला इतिहासाची माहिती नाही तो इतिहास घडविण्याची भाषा कशी काय करू शकतो, याचं मला आश्चर्य वाटते, असेही सिब्बल म्हणाले. अलेक्झांडर गंगेपर्यंत पोहोचला, चंद्रगुप्त मौर्य हा गुप्त राजवटीशी संबंधित होता तसेच तक्षशिला हे बिहारमध्ये नसून पाकिस्तानात आहे, असे मोदींना वाटत असल्याचा आरोपही कपिल सिब्बल यांनी केला.

Leave a Comment