महाराष्ट्रात पहिल्यांदा ’नकाराधिकारा’चा वापर

लातूर – सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर मतदानातून उमेदवारांना नकार देण्याचा हक्क मतदारांना मिळाला. लातूर जिल्ह्यात राज्यात पहिल्यांदाच असा मतदानाचा हक्क बजावत ग्रामपंचायत निवडणुकीत मतदारांनी मतदान यंत्रातून उमेदवारांना नकार दिला.

ग्रामपंचायत सारख्या निवडणुकीत एवढ्या मोठ्या प्रमाणावर विरोध होत असेल, तर भविष्यात येणार्‍या लोकसभा आणि विधान सभा निवडणुकीत काय चित्र असेल हे अधिक सांगायला नको. हरंगूळ ग्रामपंचायतीच्या 17 जागांसाठी तर श्यामनगर ग्रामपंचायतीच्या 11 जागांसाठी मतदान झाले. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर पहिल्यांदाच ही निवडणूक झाली.

महिन्यापूर्वीच सर्वोच्च न्यायालयाने मतदारांना निवडणुकीतील उमेदवारांना नकार देण्याचा अधिकार दिला होता. मतदान प्रक्रियेत पूर्वीपासून मतदारांना असा अधिकार आहे. त्यासाठी मतदान यंत्रावरही नकार देण्यासाठी स्वतंत्र बटनाची सोय करण्यात आली होती. मात्र, या अधिकाराचा वापर करू दिला जात नव्हता. यामुळे मतदान यंत्रावरील हे बटन केवळ शो’ साठीच होते. मतदारांची इच्छा असो किंवा नसो, त्यांना निवडणुकीतील कोणत्याही एका उमेदवाराला मतदान करणे भाग पडत होते.

सर्वोच्च न्यायालयात दाखल एका याचिकेत मतदारांना या अधिकाराचा वापर करू द्यावा अशी मागणी झाली. या याचिकेच्या सुनावणीनंतर सर्वोच्च न्यायालयाने उमेदवारांना नकार देण्याचा हक्क मतदारांना बहाल केला. मतदान यंत्रावरील हे नकार देण्याचे बटन कार्यान्वित करण्याचे आदेश निवडणूक आयोगाला सर्वोच्च न्यायालयाने दिले.

Leave a Comment