दिल बैठा गधीपर और जनम गया इप्पो

फ्लॉरेन्स – आपल्याकडे एक म्हण आहे, दिल बैठा गधीपर तो पद्मिनी क्या चीज है? म्हणजे एखादी कुरूप मुलगीच आवडली असेल तर तेथे सौंदर्याची खाण असलेल्या राणी पद्मिनीचाही प्रभाव पडू शकत नाही. प्रणयीजनांचे शहर अशी खास ओळख असलेल्या इटालीतील फ्लॉरेन्स नगरीत अशीच एक प्रेमकहाणी घडली आहे मात्र ती माणसांमधील नाही तर दोन प्राण्यांमधील आहे. विशेष म्हणजे या प्रेमाला एक गोड फळही आले असून त्याला पाहण्यासाठी नागरिक प्रचंड गर्दी करत आहेत.

हकीकत अशी की फ्लॉरेन्स जवळच्या एका फार्मवर सेरेना अक्लीट्टी व त्यांचे कुटुंबिय अनाथ प्राण्यांचा तसेच ज्या प्राण्यांना क्रूरतेने वागविले जाते अशा प्राण्यांचा संभाळ करतात. त्यांनी येथे प्राणी शेल्टरच उभारले आहे. अशा प्रकारे ते सध्या १७० प्राण्यांचा संभाळ करत असून त्यात उंट, लामा, व्हिएतनामी डुकरे, गाढवे, झेब्रा असे अनेक प्राणी आहेत. कांही वर्षांपूर्वी प्राणीसंग्रहालयात वाईट वागणूक मिळत असलेला एक झेब्रा येथे दाखल झाला. त्याचे नांव मार्टिन. मार्टिनने कपौंडमधून येताना चुकून गाढवे ठेवलेल्या तबेल्याचे दार उघडले व तो आत शिरला. तेथे असलेल्या गैडा नावाच्या गाढविणीची आणि त्याची नजरभेट झाली आणि एका क्षणात दोघे प्रेमात पडले.

मात्र या प्रेमप्रकरणाची शेतमालकाला कांहीच कल्पना नव्हती. नुकताच गैडा गाढवीणीने एका गोंडस पिलाला जन्म दिला आणि ही प्रेमकहाणी उजेडात आली. कारण मार्टिन आणि गैडा यांच्या संकरातून जन्मलेले इप्पो हे पिलू चेहर्‍याने आईसारखे आहे पण त्याचे पाय मात्र मार्टिन झेब्रयासारखे पट्टेदार आहेत. इप्पो चे अनोखे रूप पाहून मालक आनंदला आणि ही बातमी कळताच शेकडो लोकांनी इप्पोला पाहण्यासाठी एकच गर्दी केली. अनेकांनी इप्पोला मोबाईल कॅमेर्‍यात छबीबद्ध केले. आता मालक सेरेना सांगते की त्यांना इप्पोच्या फोटोचे हक्क मिळावेत म्हणून दोन कंपन्यांकडून ऑफर्स आल्या आहेत. त्यातील एक सॉफट टॉय बनविणारी कंपनी आहे तर दुसरी आहे वॉल्ट डिस्ने.
 
इप्पो सध्या आईचे दूध आणि गाजरे असा आहार घेत आहे. तज्ञांच्या मते गाढव आणि झेब्रा यांचा संकर नैसर्गिक नाही मात्र निसर्गाने ते शक्य करून दाखविले आहे. यापूर्वी अशा प्रकारचे संकर माणसाने जाणूनबूजून घडवून आणले आहेत मात्र नैसर्गिक रित्या असा संकर होण्याची ही पहिलीच ज्ञात वेळ आहे.

Leave a Comment