दिल्लीत शासक नव्हे, सेवक बसला पाहिजे – मोदी

पुणे – दिल्लीत जनतेचा शासक नव्हे तर सेवक बसला पाहिजे. 2014 मध्ये देशातील जनता भाजपला आशिर्वाद देईल. अशा शब्दात मोदींनी काँग्रेसचा समाचार आणि भाजपच्या विजयाची ग्वाही दिली. पुण्यातील आयोजित केलेल्या जाहीर सभेत मोदी बोलत होते.

दुसर्‍यांवर आरोप करण्यापेक्षा सरकारने जनतेच्या प्रश्नांची उत्तर द्यावी. तसेच गेले दोन टर्म काय केले याचा लोखाजोखाही मांडावा अशा शब्दात नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस सरकारवर टीका केली. सरकारमधील लोक मिडीयालाही भेटत नाहीत. मिडीयाच्या प्रश्नांची उत्तरं देत नाहीत. फक्त आरोप करत राहतात की मोदी काय करत आहेत. यापेक्षा आपण काय केलं याच उत्तर सरकारने द्यावे.

काँग्रेसचे लोक दुसर्‍यांवर चिखलफेक करण्याशिवाय दुसरं काम करत नाहीत. मी त्यांचं मुख्य टार्गेट आहे. सरकारने मला कोर्टकचेरीत अडकवण्याचा प्रयत्न केला. माझ्या मागे सिबिआयच्या ससेमिरा लावला आहे, असेही ते म्हणाले. गुजरातमध्ये आम्ही आमच्या कामाचा हिशेब मांडला. कामाच्या जोरावरच आम्ही बहुमताने जिंकलो. त्यामुळे काँग्रेसला गुजरातबद्दल खोटं बोलून काही हाती लागणार नाही. काँग्रेसचे नेते खोटं बोलतात. खोटी आश्वासने देणार्‍यांना दिल्लीत बसण्याचा अधिकार नाही. असे बोलत त्यांनी काँग्रेस नेत्यांवर अप्रत्यक्षपणे टीका केली.

देशात महिला सुरक्षित नाहीत. बेरोजगारी वाढली आहे. याला जबाबदार कोण? जनतेचा काँग्रेस सरकारवरील विश्वास उडाला आहे. सत्तेत आल्यावर भाजप खर्चाचा हिशेब देईल असे आश्वासन मोदींनी यावेळी दिले. मोरारजी देसाई आणि अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळात महागाई नियंत्रणात होती. गरीबांना दोन वेळचं जेवण मिळत होतं. आता मात्र महागाईने सीमा ओलांडली असून गरीबांना यामुळे असल्याचे सांगत मोदींनी वाढत्या महागाईचे खापर काँग्रेस सरकारवर फोडले.

देशात अनेक राज्यांत छोट्या छोट्या पक्षांचं सरकार आहे. देशातील जनतेने सर्वच प्रकारच्या मॉडेलचे सरकार अनुभवलं आहे. राजकीय तज्ञांनी कोणत्या पक्षाच्या सरकारने कशा पद्धतीने काम केलं याचा तुलनात्मक अभ्यास करावा. या अभ्यासानंतरच भारतीय जनता पक्षाने नक्की काय काम केलं हे जनतेसमोर येईल. भाजपनं सगळीकडे स्थिती सुधारली आहे. असे मोदी म्हणाले.

Leave a Comment